गोंदियाविदर्भ

जिल्ह्याचा राज्यात ऐतिहासिक ‘चौकार’ ; प्रधानमंत्री आवास योजनेत सलग चौथ्यांदा प्रथम

केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण

​गोंदिया : ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्याने पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. महा आवास अभियान २०२३-२४ अंतर्गत जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून सलग चौथ्यांदा राज्यात अव्वल येण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे.

​शुक्रवार, १५ मे रोजी सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. केंद्रीय ग्रामीण विकास व कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

​या मोहिमेत केवळ गोंदिया जिल्हाच नव्हे, तर नागपूर विभागानेही आपली छाप सोडली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत नागपूर विभागाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर विभाग राज्यात प्रथम ठरला आहे. जिल्ह्याच्या या यशाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे मनोबल उंचावले आहे. ​जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्रामीण विकास यंत्रणेच्या चिकाटीमुळेच हे यश शक्य झाले आहे. अत्यंत दुर्गम भाग असूनही लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे आणि वेळेत घरकुले पूर्ण करणे या निकषांवर जिल्ह्याने बाजी मारली आहे.

​”सलग चौथ्यांदा राज्यात प्रथम येणे ही गोंदिया जिल्हावासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. लाभार्थ्यांनी प्रशासनावर दाखवलेला विश्वास आणि कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळेच आम्ही हा ‘चौकार’ गाठू शकलो. गरीब कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे, हेच आमचे ध्येय असून भविष्यातही हा लौकिक आम्ही कायम राखू,” अशी प्रतिक्रिया जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

​जिल्ह्याने मिळवलेल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, गोंदिया पॅटर्नची चर्चा आता संपूर्ण राज्यात सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button