गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोलीत माओवादाचा अंत! ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ यशस्वी; ८ जहाल माओवाद्यांना अटक, ६५ लाखांची रोकड जप्त

​गडचिरोली : गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने संयुक्तपणे राबविलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत माओवादी चळवळीला आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि निर्णायक हादरा दिला आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फोदेवाडा चकमकीत एका सी-६० जवानाच्या हत्येत सामील असलेल्या जहाल माओवाद्यांसह एकूण ८ माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावरील एकही माओवादी आता शिल्लक राहिलेला नसून, जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आल्याची अधिकृत घोषणा पोलीस दलाने केली आहे.

​पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या या विशेष मोहिमेत अत्यंत शिताफीने कारवाई करण्यात आली. यामध्ये तेलंगणा राज्यातील विकाराबाद (रुकमापूर रेल्वे स्टेशन) येथून ४, मौजा कुमनार येथून २ आणि मौजा नैताळा येथून २ अशा एकूण ८ माओवाद्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन डीव्हीसीएम (DVCM), दोन पीपीसीएम (PPCM) आणि चार सदस्यांचा समावेश आहे.

​अटक करण्यात आलेल्या आठही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ६४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यामध्ये १६-१६ लाखांचे बक्षीस असलेले राजू ऊर्फ मंगडू वेको (DVCM) आणि ज्योती ऊर्फ अकिला पोटावी (DVCM) यांसारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे राजू वेको याच्यावर २७ गुन्हे (१४ चकमकी, ७ खून) दाखल असून, तो कंपनी क्रमांक १० चा प्रभारी होता.

​अटक माओवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी विविध जंगल परिसरात शोध मोहिमा राबविल्या. यादरम्यान माओवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये: ​अग्निशस्त्रे: २ एलएमजी (LMG), ४ एके-४७, ४ एसएलआर, ३ इन्सास, ३०३ रायफल व इतर अशी एकूण ५१ शस्त्रे. ​साहित्य: मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे, मॅगझिन, बीजीएल लाँचर आणि डेटोनेटर. ​रोख रक्कम: एकूण ६५ लाख ३४ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.

जिल्ह्याला माओवादमुक्त करण्याच्या दिशेने हे सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. आम्ही वारंवार आत्मसमर्पणाचे आवाहन केले होते, मात्र जे लपून राहिले त्यांचा ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ मध्ये शोध घेऊन अटक केली आहे. आता अभिलेखावरील एकही माओवादी जिल्ह्यात सक्रिय नाही.”

​ही ऐतिहासिक कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक योगेश कुमार, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. आणि विशेष अभियान पथक (प्राणहिता व गडचिरोली) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व जवानांनी फत्ते केली.

​अटक करण्यात आलेले माओवादी आणि बक्षीस: १. राजु ऊर्फ मंगडु वेको (१६ लाख), २. ज्योती ऊर्फ अकिला पोटावी (१६ लाख), ३. जन्नी ऊर्फ नगी येमला (८ लाख), ४. जयराम मोंगे गावडे (८ लाख), ५. मुकेश ऊर्फ लच्छु अवलाम (४ लाख), ६. विजय ऊर्फ मंगडू तामो (४ लाख), ७. रजिता ऊर्फ शामबत्ती मडावी (४ लाख), ८. आमती ऊर्फ संध्या पोडीयाम (४ लाख).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button