गडचिरोलीविदर्भ

शिक्षकांमुळेच आदिवासी मुलांचे आयुष्य बदलेल – आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन

सिरोंचा येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा 

​सिरोंचा : “शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून समाज घडवण्याची मोठी शक्ती आहे. दुर्गम भागात अखंड परिश्रमाने काम करून आदिवासी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका मोलाची आहे. तुमच्या सेवेमुळेच या मुलांचा आत्मविश्वास वाढून संपूर्ण समाज उज्ज्वल होईल,” असे प्रतिपादन भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव तथा आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.

​सिरोंचा येथे भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सिनेट सदस्य तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, संस्थेचे उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, तसेच अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

​संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारे सार्वजनिक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक कर्मचाऱ्याला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील आठवणींना उजाळा मिळाल्याने अनेक कर्मचारी यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

​आ. आत्राम पुढे म्हणाले की, “आजचा हा सत्कार म्हणजे तुमच्या निष्ठेला दिलेला छोटासा आदर आहे. तुमच्या मेहनतीमुळेच शाळांचे मानवीकरण झाले आणि स्थानिक समाजाचा समग्र विकास साधणे शक्य झाले. तुम्ही केवळ कर्मचारी नव्हता, तर परिवर्तनाचे वाहक होतात.”

​या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसोबतच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. सिरोंचा तालुका मुख्यालयात नायब तहसीलदार म्हणून सेवाभावी काम करणारे श्रीनिवास तोटावर व सय्यद हमीद यांचा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सिरोंचातील हा सोहळा केवळ एक सत्कार समारंभ न ठरता, दुर्गम भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाची पावती देणारा एक कृतज्ञता सोहळा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button