गडचिरोलीविदर्भ

महा-टीईटी : गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयात पात्रता प्रमाणपत्रे उपलब्ध

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावी – शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार

गडचिरोली: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) निकाल जाहीर झाल्यानंतर, आता पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची प्रमाणपत्रे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद कार्यालयास प्राप्त झाली असून, संबंधित उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली प्रमाणपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ चा अंतिम निकाल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला होता. या परीक्षेत जे उमेदवार पात्र ठरले आहेत, त्यांना आता कायमस्वरूपी पात्रता प्रमाणपत्रे दिली जात आहेत.

उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना खालील मूळ कागदपत्रे आणि त्यांचा एक साक्षांकित छायांकित (Xerox) संच सोबत आणणे अनिवार्य आहे: TET प्रवेश पत्र: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रवेश पत्राची प्रत. गुणपत्रिका: टीईटी परीक्षेच्या गुणपत्रिकेची प्रत. शैक्षणिक पात्रता: डी.एड. (D.Ed) किंवा बी.एड. (B.Ed) उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक. आरक्षण व प्रवर्ग: मागासवर्गीय उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्राची प्रत. ओळखपत्र : आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी एक. विशेष प्रवर्ग: दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र किंवा माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा अधिकृत पुरावा.

प्रमाणपत्र वाटपावेळी सर्व मूळ कागदपत्रांची कसून तपासणी केली जाणार आहे. तपासणी दरम्यान कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे आढळल्यास किंवा कागदपत्रांमध्ये अनियमितता दिसून आल्यास, संबंधित प्रकरण तात्काळ आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडे सोपवण्यात येईल. त्यांच्या अंतिम निर्णयानुसार दोषी उमेदवारावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button