क्राईमगोंदियाविदर्भ

रावणवाडीत ढाबा चालकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

जुन्या वैमनस्यातून हत्येची परिसरात चर्चा ; कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये तीव्र चिंता आणि संताप

गोंदिया : तालुक्यातील रावणवाडी येथे १९ मेच्या मध्यरात्री एका ४५ वर्षीय ढाबा चालकाची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या थरारक हत्याकांडामुळे रावणवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राजकुमार मदन हरीणखेडे (वय ४५, रा. रावणवाडी) असे मृत ढाबा चालकाचे नाव आहे.

राजकुमार हरीणखेडे हे रावणवाडी परिसरात ढाबा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. १९ मेच्या मध्यरात्री अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केला. आरोपींनी राजकुमार यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की, राजकुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी केटीएस (KTS) सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे पाठवला आहे. ही हत्या जुन्या वैमनस्यातून किंवा कौटुंबिक वादातून झाली असावी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे; मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत कारणाचा खुलासा केलेला नाही.

या हत्येच्या घटनेमुळे रावणवाडी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील काही काळापासून या भागात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यापूर्वी पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. एका गरोदर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटनाही नुकतीच समोर आली होती. परिसरात बेकायदेशीर अमली पदार्थांची (ड्रग्ज) विक्री आणि वाढती तस्करी यांमुळे तरुण पिढी बरबाद होत असून नागरिक संतप्त आहेत.

या अमानुष हत्येमुळे सध्या रावणवाडी परिसरात तणावपूर्ण शांतता असून, व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. “पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि या हत्येतील मुख्य आरोपींना चोवीस तासांच्या आत अटक करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. रावणवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक आरोपींचा शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button