चंद्रपूरविदर्भ

विधान परिषद निवडणूक: चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी घेतला आढावा

​चंद्रपूर : वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली विधान परिषद स्थानिक प्राधिकारी द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. २१) सर्व नोडल अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.

​जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ‘झिरो एरर’ निवडणुकीसाठी विविध सूचना दिल्या. प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे निर्देश देतानाच त्यांनी अचूक मतदार यादी तयार करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तिन्ही जिल्ह्यातील मतदारांच्या नावांच्या अग्रक्रमानुसार याद्या तातडीने चंद्रपूर मुख्य कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

​​निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ​मतदान केंद्रे: तिन्ही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय किंवा तहसील कार्यालय येथे मतदान केंद्र ठेवण्याचे नियोजन आहे. ​तंत्रज्ञानाचा वापर: सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) आणि वेब कास्टिंगची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ​मनुष्यबळ नियोजन: निवडणुकीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची तातडीने पडताळणी करून नियोजन पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

​​या बैठकीला चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्यासह निवडणूक विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखडे आणि वर्धाचे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. नियोजनामुळे वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली या त्रिकोणी कार्यक्षेत्रात विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button