
जिल्ह्याला १७ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ; ‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत आराखडा तयार
गोंदिया : जिल्हा नैसर्गिक वनसंपदेने आधीच नटलेला आहे. मात्र, आता या वनसंपदेचा वापर जिल्ह्याच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी केला जाणार आहे. “जिल्ह्यात पर्यटनाला पूरक ठरेल अशा पद्धतीने वृक्षारोपणाचे नियोजन करावे, जेणेकरून मोठ्या संख्येने पर्यटक या विभागाकडे वळतील,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वृक्षारोपण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपवनसंरक्षक पवन कुमार जोंग यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
’विकसित भारत २०४७’ च्या संकल्पनेला साजेसा ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी राज्य सरकारने हरित महाराष्ट्र आयोगाच्या माध्यमातून ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेमुळे राज्यातील वनाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर, गोंदिया जिल्ह्याला यंदा १७ लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला: नियोजित वृक्षारोपण: जिल्ह्याला ५१ टक्के वनसंपदा लाभली आहे. त्यात भर टाकताना वृक्षारोपण अशा पद्धतीने करावे की त्यामुळे जिल्ह्याचे सौंदर्य वाढेल. स्थानिक वृक्षांना प्राधान्य: वड, पिंपळ यांसारख्या वातावरणीय परिसंस्थेला पोषक आणि जिल्ह्याच्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या वृक्षांची लागवड केली जाईल. आर्थिक संधी: वृक्षारोपणातून भविष्यात कार्बन क्रेडिट आणि ग्रीन क्रेडिट मिळणार असून, नर्सरीच्या माध्यमातून स्थानिकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे नियोजन आहे.
केवळ झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून हे नियोजन केले जात आहे. हरित महाराष्ट्र आयोगामार्फत प्रत्येक नवीन रोपाचे जीआय टॅगिंग (GI Tagging) केले जाणार आहे, ज्यामुळे पुढील ५ वर्षे त्या रोपाच्या संगोपनावर आणि रक्षणावर बारकाईने लक्ष ठेवणे सोपे होईल.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांच्यासह अदानी फाउंडेशन, नेचर केअर फाउंडेशन, वृक्षधारा फाउंडेशन, लायन्स क्लब आणि सावन बहेकार (सेवा सारस मित्र) यांसारख्या सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून गोंदिया जिल्हा ‘हरित आणि पर्यटन स्नेही’ बनवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.



