
२५ लाखांचे प्रलंबित बिल आणि नवीन निविदा मंजूर करण्यासाठी मागितली होती लाच; धंतोली पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर : शासकीय कामांसाठी कंत्राटदारांचे बिल मंजूर करणे आणि नवीन निविदांचे काम मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा विभागातील एका उच्चपदस्थ ‘वर्ग-१’ (Class 1) अधिकाऱ्याला तब्बल ७० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्यांच्याच कार्यालयात रंगेहाथ अटक केली. रवींद्र निळकंठराव वानखेडे (पद- अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, जलसंपदा विभाग, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वर्ग-१ अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे एक नोंदणीकृत कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टर) आहेत. त्यांनी करजखेडा (जि. भंडारा) येथील १० लाख रुपयांचे आणि लखमापूर (जि. नागपूर) येथील १५ लाख रुपयांचे, असे एकूण २५ लाख रुपयांच्या पाठबंधाऱ्यांच्या कामाचे प्रलंबित बिल मंजुरीसाठी जलसंपदा विभाग, नागपूर येथे सादर केले होते. हे बिल मंजूर करून देण्यासाठी अधीक्षक अभियंता रवींद्र वानखेडे यांनी २ टक्के प्रमाणे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कंत्राटदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नागपूर एसीबी कार्यालयात यासंबंधी रीतसर तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने २१ मे २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी वानखेडे यांनी केवळ प्रलंबित बिलासाठीच नव्हे, तर भुराटोला (जि. भंडारा) आणि खडकी मायनर (नागपूर) येथील १० लाख रुपयांच्या पाठबंधाऱ्यांच्या नवीन कामाची निविदा तक्रारदाराच्या नावे मंजूर करून देण्यासाठी आणखी २० हजार रुपयांची मागणी केली. अशा प्रकारे एकूण ७० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
लाचेची रक्कम स्वीकारण्याचे निश्चित होताच, एसीबीच्या पथकाने जलसंपदा विभागाच्या कार्यालयातच वानखेडे यांच्या स्वतःच्या कक्षात सापळा रचला. ठरल्यानुसार तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताच अधीक्षक अभियंता रवींद्र वानखेडे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
वानखेडे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या शासकीय कक्षातच त्यांची अंगझडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान त्यांच्याकडून लाचेच्या ७० हजार रुपयांव्यतिरिक्त आणखी ३६,६३० रुपये रोख जप्त करण्यात आले असून, या रकमेबाबतही पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, अस्मिता मेश्राम, करुणा सहारे, गीता चौधरी, आशिष वैद्य, प्रफुल भातुलकर, होमेश्वर वाईलकर आणि वाहन चालक राजेंद्र जांभुळकर यांनी सहभाग घेतला.
लाचखोरांना धडा शिकवण्यासाठी एसीबीचे आवाहन
“नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील कोणत्याही नागरिकाकडे शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केली जात असल्यास, त्यांनी तात्काळ एसीबी नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा. तक्रारदारांची सापळ्यात वापरलेली रक्कम १ महिन्याच्या आत परत केली जाईल, तसेच त्यांचे अडकलेले वैध कामही पूर्ण करून दिले जाईल.”



