कृषीगोंदियाविदर्भ

आधुनिक शेतीच्या ‘थ्री-डी’ मंत्राशी शेतकऱ्यांनी जुळावे – जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांचे आवाहन

डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेती होणार स्मार्ट ; महाविस्तार, ॲग्रीस्टॅक आणि क्रॉप सॅप ॲप्सचा लाभ घेण्याचे आवाहन

गोंदिया : हवामानाचा अचूक अंदाज, पिकांवरील कीड-रोगांचे व्यवस्थापन आणि शेतमालाला मिळणारा बाजारभाव या सर्व गोष्टी आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या विविध डिजिटल ॲप्सचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा, जेणेकरून भविष्यातील नैसर्गिक आपत्तीपासून बचाव होऊन शेती फायदेशीर ठरेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केल्यानुसार, महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रासाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ॲग्रीस्टॅक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आधुनिक शेती आता डेटा, ड्रोन आणि डिजिटल तंत्रज्ञान या तीन ‘डी’ वर आधारित असेल. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त प्रमुख डिजिटल प्रणाली:महाविस्तार २.० शेतकरी डायरी, हवामान अंदाज, बाजारभाव आणि AI आधारित चॅटबॉट सुविधा. क्रॉपसॅप २.० पिकांवरील कीड-रोगांची AI फोटोद्वारे ओळख आणि तात्काळ पीक संरक्षण सल्ला. वसुधा AI सेवा टोल-फ्री क्रमांक १५५३१३ वरून व्हॉईस सेवेद्वारे थेट कृषी मार्गदर्शन. पी-सीबीडीएस आरबीआयच्या सहकार्याने अनुदानाचे थेट डिजिटल वॉलेटमध्ये वितरण (पारदर्शक व्यवहार). महाट्रेस शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी निर्यातीची पारदर्शक साखळी.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पावसात संभाव्य खंड पडल्यास संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहावे, याकरिता जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनमुळे पीक विमा, अनुदान आणि विविध योजनांमध्ये पारदर्शकता आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांनी ‘महाविस्तार’ आणि ‘क्रॉपसॅप’ सारखी ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावीत. यामुळे केवळ माहितीच मिळणार नाही, तर आपत्तीची पूर्वकल्पना मिळाल्याने नुकसानही टाळता येणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. गोंदावले सांगितले.

अचूक निदान, अचूक सल्ला आणि चला परतवू कीड-रोगांचा हल्ला! या घोषवाक्यासह जिल्हा प्रशासन आता कृषी विभागाच्या या डिजिटल क्रांतीला तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button