
स्थानिक गुन्हे शाखेने सौंदड फ्लायओव्हरजवळ रचला सापळा; छत्तीसगडवरून नागपूरला चालली होती तस्करी
गोंदिया : जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अमली पदार्थांच्या तस्करांचा मोठा डाव उधळून लावला आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथून नागपूरकडे काळ्या रंगाच्या ‘महिंद्रा थार’ कारमधून चाललेली गांजाची मोठी खेप पोलिसांनी जप्त केली. डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौंदड रेल्वे उड्डाणपुलाजवळ रविवार, २४ मे रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ३८ किलो ५०० ग्रॅम गांजा, आलीशान थार कार आणि मोबाईलसह एकूण ५४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका विधीसंघर्ष बालकासह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वरून देवरी-कोहमारा मार्गे एका काळ्या रंगाच्या थार कारमधून गांजाची तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सौंदड रेल्वे उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी लावली. काही वेळातच रायपूरच्या दिशेने सदर संशयित थार कार येताना दिसली. मात्र, समोर पोलिसांची नाकाबंदी असल्याचे पाहताच चालकाने कार थांबवण्याऐवजी ती हायवेच्या विरुद्ध दिशेने (राँग साईड) घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
कार पळत असल्याचे पाहून सतर्क पोलीस पथकाने तात्काळ शासकीय वाहनाने त्या कारचा थरारक पाठलाग केला आणि काही अंतरावर तस्करांच्या गाडीला वेढा घालून ती थांबवण्यास भाग पाडले. गाडी थांबताच त्यातून तीन जण उतरून बाजूलाच असलेल्या घनदाट जंगलाच्या दिशेने पळू लागले. पोलिसांनीही त्यांच्या मागे जंगलात धाव घेतली आणि दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. मात्र, तिसरा आरोपी रात्रीच्या अंधाराचा आणि दाट झुडपांचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना वाहनाजवळ आणून पंचांसमक्ष थार कारची कसून झडती घेतली. यावेळी कारच्या डिक्कीत आणि मधल्या सीटवर प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये खाकी रंगाच्या टेपने गुंडाळलेले एकूण ४० बंडल्स आढळून आले. सदर बंडल उघडून पाहणी केली असता हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया (शेंडे व बोंडे) मिश्रित गांजा एकूण ३८ किलो ५०० ग्रॅम, हिरवा ओलसर गांजा किंमत ३८ लाख ५० हजार व गांजाची वाहतूक करण्याकरिता वापरलेली काळ्या रंगाची महिंद्रा कंपनीच्या थार किंमत १५ लाख रुपये व गांजा व्यवसायाकरिता वापरत असलेले ४ मोबाइल किंमत ८० हजार रुपये असा एकूण ५४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी विवेककुमार अश्विनीकुमार जोशी (वय २१, रा. डोंगरगड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) आणि एका विधीसंघर्ष बालकाला (नाबालिग) ताब्यात घेतले आहे. आरोपी विवेककुमारची कसून चौकशी केली असता, हा गांजा तो नागपूर येथील सागर खोब्रागडे नावाच्या व्यक्तीला विकण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली त्याने दिली. तसेच जंगलात पळून गेलेला तिसरा आरोपी हा सुफियानर उर्फ सोफी रजा (वय २८, रा. रज्जानगर, डोंगरगड) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पकडलेले दोन्ही आरोपी, नागपूरचा खरेदीदार सागर खोब्रागडे आणि फरार सुफियानर अशा चारही जणांविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा म्हणजेच एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध आणि नागपूरमधील अंमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.



