क्राईमगोंदियाविदर्भ

संतापजनक : खेळण्याच्या बहाण्याने बोलावून दोन बालिकांवर अत्याचार; विधीसंघर्ष बालक पोलिसांच्या ताब्यात

नात्यातील बालिकेसह शेजारी राहणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार ; अर्जुनी-मोरगाव पोलिसांत ‘पॉक्सो’ आणि ‘बीएनएस’ अंतर्गत गुन्हा दाखल

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यापासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात दोन निष्पाप बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना सोमवारी (२५ मे) उघडकीस आली. शेजारीच राहणाऱ्या एका १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाने या दोन्ही बालिकांना खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून हा गैरप्रकार केला. या संवेदनशील प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या कडक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १६ वर्षीय विधीसंघर्ष बालक हा मागील काही दिवसांपासून त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन लहान बालिकांना खेळण्याच्या हेतूने आपल्या घरी बोलवायचा. या दोन बालिकांपैकी एक बालिका त्याच्या जवळच्या नात्यातीलच आहे. तो बऱ्याच दिवसांपासून या नात्यातील बालिकेसोबत घरात कोणी नसताना अश्लील चाळे करायचा, असे तपासात पुढे आले आहे. घरातलाच मुलगा असल्याने आणि कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीने मुलीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते.

परंतु, या विधीसंघर्ष बालकाची हिंमत दिवसेंदिवस वाढत गेली. त्याने नात्यातील बालिकेसोबतच शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या एका लहान बालिकेवरही अत्याचार केला. यानंतर हा संपूर्ण गंभीर प्रकार उघडकीस आला. पीडित बालिकेने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर रविवारी (२४ मे) अत्याचारग्रस्त बालिकेच्या आईने तातडीने अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशन गाठून या मुलाविरुद्ध फिर्याद दिली. बालिकांशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी कसलाही विलंब न लावता तातडीने पथक रवाना केले आणि अवघ्या काही तासांतच १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला घरातून ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रियेनुसार या विधीसंघर्ष बालकाला बाल न्यायालय गोंदिया येथे हजर करण्यात आले.

याप्रकरणी स्थानिक अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २२६/२०२६ नुसार आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४ (२) (आय), ६४ (२) (एम), ६५ (२), ३५१ (३) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा २०१२ चे सहकलम ४, ६, ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला असून, पोलीस प्रशासन या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button