
‘कर्तव्य कक्ष’ सभागृहात राष्ट्रीय विचारांचा जागर ; माजी खा. अशोक नेते व आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती
गडचिरोली : क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली शहरात भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बहुउद्देशीय प्रबोधिनी, गडचिरोली’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, येत्या गुरुवार, २८ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजता चामोर्शी रोडवरील ‘कर्तव्य कक्ष’ सभागृहात (आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे जनसंपर्क कार्यालय) हे व्याख्यान पार पडणार आहे. नागपूरचे प्रसिद्ध विचारवंत आणि व्याख्याते प्रा. लक्ष्मीकांत प्रकाशराव कारिंगवार हे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन आणि दैदीप्यमान कर्तृत्व’ या विषयावर विचार पुष्प गुंफणार आहेत.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रबोधिनीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात सातत्याने महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये मॅराथॉन दौड, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जयंती महोत्सवांचा समावेश असतो. याच मालिकेचा एक भाग म्हणून यंदाच्या सावरकर जयंतीला या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, गडचिरोली नगरीतील सर्व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावरकरांच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन प्रबोधिनीने केले आहे.
या व्याख्यान सोहळ्याला अशोक नेते (माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री, अनु. जमाती मोर्चा, भाजप), डॉ. मिलिंद नरोटे (आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र), डॉ. देवराव होळी (माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अनु. जमाती मोर्चा, भाजप), रमेश बारसागडे (जिल्हाध्यक्ष, भाजप), प्रशांत वाघरे (माजी जिल्हाध्यक्ष, भाजप), प्रणोती निंबोरकर (नगराध्यक्ष, नगर परिषद गडचिरोली), डॉ. चंदा कोडवते (राज्य परिषद सदस्य, भाजप), गोविंद सारडा (जिल्हा महामंत्री, भाजप), डॉ. प्रणय खुणे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप तथा प्रदेशाध्यक्ष, मानवाधिकार) हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बहुउद्देशीय प्रबोधिनीचे अध्यक्ष रमेश भुरसे, सचिव डॉ. भारत खटी, उपाध्यक्ष प्रमोद पिपरे, सहसचिव ॲड. निळकंठ भांडेकर यांच्यासह समिती सदस्य सतिश चिचघरे, दत्तु माकोडे, रविंद्र भांडेकर, सुधाकर पेटकर आणि दिलीप मस्के अथक परिश्रम घेत आहेत. गडचिरोलीतील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या बौद्धिक मेळाव्यास सहपरिवार उपस्थित राहून आपली देशभक्ती प्रकट करावी, अशी आग्रहाची विनंती प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आली आहे.



