गडचिरोलीविदर्भ

धानोराजवळ भीषण अपघात; दुचाकीस्वारासह महिलेचा जागीच मृत्यू, १७ जखमी

लग्न आटोपून परतताना सुरसुंडी वळणावर काळाचा घाला; १० गंभीर जखमी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर, परिसरात हळहळ

धानोरा : लग्नसमारंभाचा आनंद आटोपून उत्साहाने घराकडे परतणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहनावर काळाने घाला घातला. वरातीची बोलेरो गाडी आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर झालेल्या अत्यंत भीषण धडकेत दुचाकीस्वारासह बोलेरोमधील एका ५६ वर्षीय महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात एका गरोदर मातेसह तब्बल १७ जण जखमी झाले असून, त्यापैकी १० जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ही घटना रविवारी (२५ मे) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मालेवाडा-येरकड मार्गावरील सुरसुंडी गावाजवळील धोकादायक वळणावर घडली.

अपघातातील मृत महिलेचे नाव बबीता गावतुरे (वय ५६, रा. चिंचोली) असून, दुसऱ्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसली तरी तो दुचाकीस्वार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील काही वऱ्हाडी एका बोलेरो गाडीने मालेवाडा येथे आयोजित लग्नसोहळ्यासाठी गेले होते. तिकडचे सर्व लग्नविधी आनंदाने पार पडल्यानंतर ही बोलेरो गाडी वऱ्हाडींना घेऊन परत तळेगावकडे निघाली होती. दुसरीकडे, येरकड येथून एक दुचाकीस्वार दुसऱ्या एका लग्नसमारंभासाठी पुराडाकडे जात होता. दरम्यान, सुरसुंडी गावाजवळील तीव्र आणि धोकादायक वळणावर दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

धडक इतकी वेगवान आणि भीषण होती की, धडकेनंतर वऱ्हाडींनी भरलेली बोलेरो गाडी रस्त्यावरून खाली घसरून थेट पलटी झाली. अपघात होताच घटनास्थळी लहान मुले आणि महिलांचा प्रचंड किंचाळण्याचा आवाज आणि आक्रोश पसरला. या अपघातात बोलेरोमधील बबीता गावतुरे आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले.

अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करून बोलेरोमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रोशन रामचंद्र ठलाल (२६), गौतम मडावी (३०, येरकड), जयश्री शेंडे (४५, तळेगाव), देवांगना गावतुरे (गरोदर माता, चिंचोली), अशोक मोहुर्ले (१५, माडेमुल), मिराबाई गुरनुले (६०, मोहली), शालू मोहुर्ले (४१, माडेमुल), पी.एल. गावतुरे (९, चिंचोली), वंशिका गावतुरे (६, चिंचोली), सुखदेव गावतुरे (३५, चिंचोली), शिवम गावतुरे (५, मोहली), सोनू मोहुर्ले (१३, माडेमुल), मिराबाई गुरनुले (५८, मोहली), शालू मोहुर्ले (३८, माडेमुल), राकेश गावतुरे (३५, चिंचोली), कमल ठलाल (१७, मुस्का) आणि अद्विका शेंडे (३, रा. तळेगाव) यांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक वाहने आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, त्यापैकी १० जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील अद्ययावत उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे. या घटनेमुळे दोन्ही लग्नकार्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, धानोरा पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button