भंडाराविदर्भ

‘बँक ऑफ इंडिया’च्या अग्रणी जिल्हा कार्यालयाला उत्कृष्ट राजभाषा पुरस्कार

आयुध निर्माणीच्या संयोजनाखालील बैठकीत सन्मान प्रदान ; सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित

भंडारा : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा धोरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी आणि कार्यालयीन कामकाजात हिंदी भाषेचा प्रभावी वापर केल्याबद्दल बँक ऑफ इंडिया, अग्रणी जिल्हा कार्यालय, भंडारा या कार्यालयाला सन २०२५-२६ चा प्रतिष्ठित ‘नराकास’ तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आयुध निर्माणी (Ordnance Factory) कार्यालय, भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत असलेल्या “नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (नराकास), भंडारा” च्या वतीने आयोजित विशेष अर्धवार्षिक बैठकीत हा गौरव सोहळा पार पडला.

या राष्ट्रीय स्तरावरील धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भंडारा बँक ऑफ इंडियाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हा गौरव ‘नराकास’ चे अध्यक्ष दीपक देशमुख आणि भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग, प्रादेशिक कार्यान्वयन कार्यालय (पश्चिम), मुंबई येथील सहाय्यक निदेशक प्रमोद सांगोले यांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार पद्धतीने प्रदान करण्यात आला. अग्रणी जिल्हा कार्यालयाच्या वतीने या मानाच्या पुरस्काराचा स्वीकार अग्रणी जिल्हा प्रमुख राजू नंदनवार आणि राजभाषा अधिकारी ओशीन शेख यांनी संयुक्तपणे केला.

बैठकी दरम्यान नगर राजभाषा कार्यान्वयन समितीने बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी कार्यालयाच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. कार्यालयातील दैनंदिन प्रशासकीय कामकाजात हिंदी भाषेचा केलेला प्रभावी वापर, केंद्र सरकारच्या राजभाषा धोरणांची केलेली काटेकोर व यशस्वी अंमलबजावणी, तसेच वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध राजभाषा उपक्रम आणि स्पर्धांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग, या सर्व निकषांवर हे कार्यालय अव्वल ठरल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अग्रणी जिल्हा प्रमुख राजू नंदनवार यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, ही ऐतिहासिक उपलब्धी म्हणजे केवळ एका व्यक्तीचे यश नसून, कार्यालयातील सर्व स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सामूहिक आणि प्रामाणिक प्रयत्नांचे हे गोड फलित आहे. अग्रणी जिल्हा कार्यालय, भंडारा यांनी भविष्यातही राजभाषा हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी, तसेच तिच्या अधिक प्रभावी आणि सुलभ अंमलबजावणीसाठी सातत्याने आणि अधिक ऊर्जेने प्रयत्न करण्याचा दृढ निर्धार यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button