गडचिरोलीविदर्भ

अहेरीत कचरा संकलन व नालीसफाईचे काम सुरू ; नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या पाठपुराव्याला यश

मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत १० दिवसांचा तिढा सुटला; नागरिकांना दिलासा

अहेरी : शहरातील जुन्या स्वच्छता कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या १० दिवसांपासून निर्माण झालेली भीषण ‘कचरा कोंडी’ अखेर सुटली आहे. शहरात सर्वत्र पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य आणि सफाई कामगारांच्या उपासमारीच्या मुद्यावर नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी प्रशासनाला दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची अहेरी नगरपंचायतीने गंभीर दखल घेतली. मुख्याधिकारी अभिजित सोनावणे यांनी मंगळवारी सर्व संबंधितांची तातडीने बैठक घेऊन समाधानकारक तोडगा काढल्याने हा तिढा अखेर सुटला. शहरात कचरा संकलन आणि नाल्यांचा उपसा नियमित सुरू झाल्याने अहेरीच्या जनतेला पावसाळ्याच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे.

अहेरी शहरात स्वच्छता करणाऱ्या जुन्या कंत्राटदाराची मुदत ३० एप्रिल रोजी संपली होती. मात्र, नगरपंचायतीमधील सत्ताधारी पक्षाने समोरील नियोजन योग्य वेळी व योग्य प्रकारे न केल्यामुळे अचानक शहरातील कचरा संकलन पूर्णपणे बंद पडले होते. गेल्या १० दिवसांत अहेरी शहरात जागोजागी कचऱ्याचे मोठे ढीग जमा झाले होते, तर नाल्या उपशाअभावी तुडुंब भरल्या होत्या. ऐन उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या तोंडावर शहरात दुर्गंधीचे आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याशिवाय, नवीन कंत्राट रखडल्याने रोजंदारीवर काम करणारे सफाई कामगार अचानक घरी बसले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे मोठे संकट कोसळले होते.

शहरातील ही विदारक परिस्थिती पाहून अहेरीतील अनेक त्रस्त नागरिक आणि सफाई कामगारांनी नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्याकडे धाव घेतली. गुडेल्लीवार यांनी या समस्येची त्वरित दखल घेत दोन दिवसांपूर्वी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित सोनावणे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. “येत्या ४ दिवसांत जर कचऱ्याची समस्या सुटली नाही आणि सफाई कामगारांना काम मिळाले नाही, तर कामगारांना सोबत घेऊन नगरपंचायतीसमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल,” असा थेट इशारा अमोल गुडेल्लीवार यांनी प्रशासनाला दिला होता.

आंदोलनाचा इशारा मिळताच नगरपंचायत प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मुख्याधिकारी अभिजित सोनावणे यांनी २६ मे रोजी नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक, कंत्राटदार आणि सफाई कामगार प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीत सफाई कामगारांच्या रोजगाराचा आणि शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने एक व्यवहार्य तोडगा समोर ठेवला. हा तोडगा सर्वच बाजूंनी सर्वानुमते मान्य करण्यात आल्याने अहेरीतील स्वच्छता मोहिमेचा मार्ग मोकळा झाला.

अखेर तब्बल १० दिवसांच्या खंडानंतर अहेरी शहरात घंटागाड्या फिरू लागल्या असून कचरा संकलन आणि नाल्यांचा उपसा नियमितपणे सुरू करण्यात आला आहे. पावसाळा अगदी तोंडावर असताना शहराची स्वच्छता पूर्ववत सुरू झाल्याने संभाव्य साथीच्या आजारांचा धोका टळला आहे. अहेरीच्या सुज्ञ जनतेने या यशस्वी पाठपुराव्याबद्दल नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button