गोंदियाविदर्भ

‘बार्टी’ प्रायोजित मोफत ‘क्लाऊड कम्प्युटिंग’ प्रशिक्षणाचा समारोप; विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा (MCED) यशस्वी उपक्रम ; तंत्रज्ञान क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवण्याचे मान्यवरांचे आवाहन

गोंदिया : आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेऊन गोंदियातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला ६० दिवसीय विशेष मोफत प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) गोंदिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फुलचूर पेठ येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात “Cloud Computing Services & System Administration” या विषयावर हा निवासी/अनिवासी प्रशिक्षण वर्ग चालविण्यात आला. ११ मार्च ते २१ मे २०२६ या कालावधीत चाललेल्या या दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आणि भव्य प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.

सध्याच्या कॉर्पोरेट जगतात माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्राला मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर, या ६० दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना ‘क्लाऊड कम्प्युटिंग आणि सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन’ क्षेत्रातील तांत्रिक बाजूंचे प्रत्यक्ष (Practical) आणि कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. या अभ्यासक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या आयटी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या व करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. ‘क्लाऊड कम्प्युटिंग व सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन’ हे भविष्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी केवळ प्रशिक्षण न घेता या क्षेत्रात सातत्यपूर्ण सराव, अपडेटेड ज्ञान आणि कौशल्य विकास (Skill Development) आत्मसात केल्यास ते आयटी क्षेत्रात आपले उज्ज्वल करिअर घडवू शकतात, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला ‘बार्टी’चे राज्य समन्वयक एच.आर. वाघमारे, ‘एमसीइडी’ नागपूरचे विभागीय अधिकारी तथा हिंगणा सेंटरचे केंद्रप्रमुख, ‘बार्टी’ नागपूरचे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले, ‘एमसीइडी’ गोंदियाचे प्रकल्प अधिकारी रोशन तायवाडे, गडचिरोलीचे जिल्हा प्रकल्प समन्वयक वैभव टाकळे, ‘एमसीइडी’ गोंदियाचे कार्यालयीन सहाय्यक शिशुपाल मानकर आणि कार्यक्रम समन्वयक चंद्रशेखर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्ततेनंतर आयोजक संस्थांच्या वतीने सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांना प्रमाणपत्रे सुपूर्द करून पुढील आयटी क्षेत्रातील वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button