
पुण्याच्या नामांकित ‘गॅलेक्सी आयएएस अकॅडमी’सोबत सामंजस्य करार ; ५ जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणीची संधी
गडचिरोली : राज्य शासनाच्या सेवेत अधिकारी बनून आपले करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) पूर्व व मुख्य परीक्षांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना निशुल्क दर्जेदार मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि पुण्याच्या नामांकित ‘गॅलेक्सी आयएएस अकॅडमी’ यांच्यात नुकताच एक विशेष सामंजस्य करार करण्यात आला आहे. या ऐतिहासिक उपक्रमाअंतर्गत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमधील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश नोंदणी प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे.
या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांना ५ जून २०२६ पर्यंत गोंडवाना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. यासाठी २०० गुणांची लेखी प्रवेश परीक्षा आणि २५ गुणांची तोंडी मुलाखत घेतली जाईल. या निवड प्रक्रियेतून पहिल्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
निवड झालेल्या या ५० भाग्यवान विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्य परिसरात तब्बल १८ महिन्यांच्या (दीड वर्ष) प्रदीर्घ कालावधीसाठी पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामध्ये एमपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षांचा संपूर्ण अद्ययावत अभ्यासक्रम. नियमित सराव परीक्षा आणि मुलाखतीचे विशेष मार्गदर्शन. प्रत्येक विषयानुसार दर्जेदार अभ्यास साहित्य आणि तज्ज्ञांच्या नोट्स. पुण्याच्या ‘गॅलेक्सी आयएएस अकॅडमी’चे अनुभवी व नामांकित मार्गदर्शक थेट गडचिरोलीत येऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी विद्यापीठ परिसरात स्वतंत्र अभ्यासिका, स्पर्धा परीक्षांची विशेष मासिके, विविध संदर्भग्रंथ आणि स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करताना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, गॅलेक्सी आयएएस अकॅडमीचे संचालक नयन राठोड, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. विवेक जोशी, तसेच स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक डॉ. वैभव मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रवेश परीक्षा, पात्रता, अभ्यासक्रम आणि नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या https://unigug.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी आर्थिक विवंचनेचा विचार न करता या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.



