गडचिरोलीविदर्भ

आलापल्लीत ‘राधा-राणी भजन मंडळा’ला अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून साऊंड सिस्टीम भेट

धार्मिक व सामाजिक उपक्रमांना मिळणार नवे बळ ; मंडळाच्या सदस्यांनी मानले आभार

आलापल्ली : समाजात भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकोप्याची भावना रुजविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या आलापल्ली येथील मोद्दुमोडगुच्या ‘राधा-राणी भजन मंडळा’च्या उल्लेखनीय कार्याची अहेरी इस्टेटने दखल घेतली आहे. माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वतीने या मंडळाला एक अत्याधुनिक साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली आहे. समाजासाठी निस्वार्थपणे आणि निरपेक्ष भावनेने कार्य करणाऱ्या संस्था व मंडळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मोद्दुमोडगु येथील राधा-राणी भजन मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून परिसरामध्ये विविध धार्मिक, सामाजिक व भजनांच्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करत असते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात भक्तीभाव निर्माण करणे, तरुण पिढीमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणे आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याचे मोठे कार्य हे मंडळ अविरतपणे करत आहे. या निस्वार्थ कार्याला अधिक गती मिळावी व मंडळाचे कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या अधिक दर्जेदार व्हावेत, यासाठी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी ही साऊंड सिस्टीम सप्रेम भेट दिली. या मौल्यवान भेटीमुळे मंडळाच्या आगामी धार्मिक व सामाजिक उपक्रमांना डिजिटल बळ मिळणार असून अधिक प्रभावीपणे भजन व कीर्तनांचे सादरीकरण करता येईल, अशी भावना मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली.

साऊंड सिस्टीम स्वीकारताना राधा-राणी भजन मंडळाच्या सदस्यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे मनापासून आभार मानले. “समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि लोककल्याणकारी संस्थांसाठी सातत्याने योगदान देणारे नेतृत्व पाठीशी असेल, तर दुर्गम भागातील सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याची नवीन प्रेरणा मिळते,” अशा कृतज्ञतापूर्वक भावना यावेळी मंडळाच्या वतीने काढण्यात आल्या.

या प्रसंगी भाजपचे जिल्हा सचिव अभिजित शेंडे, आलापल्लीचे पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार, भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष मलेश तोटावार, अंकुश शेंडे, राजस्मित पोचमपल्लीवार, प्रगतशील सामाजिक कार्यकर्ते आलोक शील, किशोर धकाते, विश्वजित शील आणि तुलसी शील यांच्यासह राधा-राणी भजन मंडळाचे सर्व महिला व पुरुष सदस्य, गायक, वादक आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button