गडचिरोलीविदर्भ

‘UIT’ अडपल्लीच्या विद्यार्थ्यांची थेट खाण उद्योगात झेप; लॉयड्स मेटल्समध्ये उन्हाळी इंटर्नशिप व औद्योगिक प्रशिक्षणाचा प्रारंभ

सूरजगड आणि कोनसरी प्रकल्पात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाची संधी ; शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात मजबूत दुवा निर्माण करण्याचा बी. प्रभाकरन यांचा संकल्प

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (UIT), अडपल्ली येथील डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीकडे एक मोठे पाऊल टाकले आहे. २० मे रोजी परीक्षा यशस्वीरित्या आटोपल्यानंतर, सर्व शाखांतील प्रथम वर्ष व द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांमध्ये आपल्या उन्हाळी इंटर्नशिप आणि औद्योगिक प्रशिक्षणाला अधिकृत सुरुवात केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणासोबतच थेट कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळावा, यादृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि तांत्रिक गरजा लक्षात घेऊन कंपनीने दोन स्तरांवर प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे: १८ वर्षांखालील विद्यार्थी: या विद्यार्थ्यांना ‘लॉयड्स अकॅडमिक स्किल सेंटर’, बोडली येथे कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे. १८ वर्षांवरील विद्यार्थी: या प्रौढ विद्यार्थ्यांना लॉयड्स मेटल्सच्या कोनसरी आणि सूरजगड येथील मुख्य प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष काम पाहाण्याची व शिकण्याची संधी मिळाली आहे.

विशेष म्हणजे, मायनिंग इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यांना थेट ‘सूरजगड मायनिंग प्रकल्पात’ तैनात करण्यात आले असून, तिथे ते खाण उद्योगाविषयीचे प्रत्यक्ष आणि व्यावहारिक ज्ञान अनुभवी तंत्रज्ञांकडून घेत आहेत.

या दीड ते दोन महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना आधुनिक इंजिनिअरिंग तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, औद्योगिक सुरक्षा पद्धती आणि कार्यस्थळ व्यवस्थापन यांचे थेट धडे दिले जात आहेत. नामांकित उद्योगतज्ज्ञ आणि वरिष्ठ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये विकसित होत आहेत. कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांची राहण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढावे आणि कामातील समर्पण वाढावे, यासाठी कंपनी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ‘स्टायपेंड’ देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू आहे.

हा महत्त्वपूर्ण उपक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि मार्गदर्शनामुळे साकार झाला आहे. “विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किंवा सैद्धांतिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारखान्यात येऊन व्यावहारिक औद्योगिक अनुभव आणि तांत्रिक प्राविण्य आत्मसात करावे,” यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक तरुणांचा सर्वांगीण विकास साधत शिक्षण आणि उद्योग यांच्यात एक मजबूत आणि शाश्वत दुवा निर्माण करण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

हा इंटर्नशिप कार्यक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम आणि औद्योगिक कार्यपद्धती यांतील दरी कमी करण्यास अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांची रोजगारक्षमता मजबूत होईल आणि भविष्यातील यशस्वी इंजिनिअरिंग करिअरसाठी ते सज्ज होतील. लॉयड्स मेटल्सने युआयटी अडपल्लीच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचे सहकार्य केले असून, याही उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक वर्गाकडून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button