ऑपरेशन अंतिम प्रहार : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर माओवाद्यांचा मोठा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त!

गडचिरोली व नारायणपूर पोलिसांचे संयुक्त आंतरराज्यीय महाअभियान ; इन्सास रायफल, आयईडी स्फोटकांसह लेथ मशीन व शस्त्रनिर्मितीचे अवाढव्य साहित्य नष्ट
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाने शेजारील छत्तीसगड राज्यातील नारायणपूर पोलिसांच्या मदतीने माओवादी चळवळीच्या कंबरडे मोडणारी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांकडून मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे, महाराष्ट्र-छत्तीसगडच्या दुर्गम सीमावर्ती जंगलात सुरू असलेला माओवाद्यांचा मुख्य शस्त्रनिर्मिती कारखाना सुरक्षा दलांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे.
‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या आंतरराज्यीय संयुक्त मोहिमेत जवानांनी जमिनीतून मोठ्या प्रमाणावर घातक शस्त्रसाठा, २५ किलो आयईडी स्फोटके आणि शस्त्र तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजड लेथ मशिन्स हस्तगत केल्या आहेत. या धडक कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता जवळजवळ संपुष्टात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली पोलीस दलासमोर अलीकडेच शरण आलेल्या काही माओवाद्यांची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, त्यांनी या गुप्त कारखान्याची माहिती उघड केली. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील काकूर पोलीस स्टेशनपासून साधारण ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमावर्ती घनदाट जंगलात माओवाद्यांनी शस्त्रनिर्मितीचा कारखाना थाटला होता. तसेच सुरक्षा दलांवर मोठा घातपात घडवण्यासाठी प्रचंड प्रमाणात दारूगोळा जमिनीत लपवून ठेवला होता. या माहितीच्या आधारे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या थेट मार्गदर्शनाखाली २६ मे रोजी या भागात एक अत्यंत गोपनीय आंतरराज्यीय शोध मोहीम आखण्यात आली.
२७ मे रोजी विशेष अभियान पथक ‘प्राणहिता’च्या ४ तुकड्या, डीआरजी नारायणपूरचे १ पथक आणि बीडीडीएस (BDDS – बॉम्ब शोधक व नाशक पथक) प्राणहिताच्या २ पथकांनी संपूर्ण जंगलाला वेढा घातला. बीडीडीएस पथकाने मेटल डिटेक्टर्सच्या साहाय्याने जमिनीची कसून तपासणी केली असता, जमिनीत गाडलेले खालील अवाढव्य साहित्य पोलिसांच्या हाती लागले.

शस्त्रे व काडतुसे: ०१ आधुनिक इन्सास (INSAS) रायफल, ०२ सिंगल शॉट रायफल, ०२ नग १२ बोअर रायफल आणि एकूण १८ जीवंत काडतुसे (ज्यामध्ये SLR, .३०३ आणि १२ बोअरच्या काडतुसांचा समावेश आहे). स्फोटके व दारूगोळा: २५ किलोग्रॅम वजनाचा महाभयंकर आय.ई.डी. (IED) स्फोटक साठा, ०२ क्लेमोर माईन्स, ११० नग डेटोनेटर्स, कॉर्टेक्स वायर आणि ५०० पेक्षा अधिक बिजीएल (BGL) सेल व ३ ट्युब लाँचर. कारखान्यातील यंत्रसामग्री: माओवाद्यांना स्वतःची शस्त्रे बनवण्यासाठी लागणारे ०२ अवाढव्य लेथ मशिन्स (Lathe Machines), ०२ इलेक्ट्रिक मोटर, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटऱ्या, वायर बंडल्स आणि जंगलात वीज पुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोलर प्लेट्स. यातील घातक आणि जड स्वरूपाचे शस्त्रास्त्र निर्मितीचे साहित्य जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घटनास्थळावरच नष्ट केले आहे.
माओवादी नेहमीच नक्षल सप्ताह, निवडणुका किंवा अंतर्गत कार्यक्रमांच्या निमित्ताने सुरक्षा दलांचे मोठे नुकसान करण्यासाठी आणि भागात दहशत पसरवण्यासाठी या लपवलेल्या शस्त्रांचा वापर करत असत. मात्र, २३ मे च्या यशस्वी कारवाईनंतर आता २७ मे रोजी पुन्हा एकदा गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या प्रचंड मोठ्या प्रहारामुळे माओवाद्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आणि नारायणपूरचे पोलीस उप-अधीक्षक मनोज मंडावी यांच्या संयुक्त रणनीती व अचूक मार्गदर्शनाखाली पार पडली. या अजोड कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्व जवानांचे कौतुक केले आहे.



