महाराष्ट्रमुंबई

राज्यात १ जूनपासून हवामानात बदल : विदर्भासह ‘या’ भागांत वादळी पावसाचा अंदाज; कमाल तापमानात होणार घट!

पेरणीची घाई न करण्याचे कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन 

मुंबई : मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आता राज्यातील हवामानात लक्षणीय बदल होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवार १ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात राज्याच्या हवामानात आणखी मोठे फेरबदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या नवीन बदलांनुसार, राज्यातील प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टीच्या भागातही काही प्रमाणात पाऊस हजेरी लावू शकतो.

या संभाव्य हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील नागरिक व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळी वातावरण तयार होणार असल्यामुळे मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. मात्र, विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भात, कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात होणाऱ्या या वादळी पावसाचा थेट मान्सूनशी कोणताही संबंध नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नाही. सध्याच्या एकूण उपग्रहीय स्थितीचा आणि हवामानाचा अंदाज घेतला असता, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे हा केवळ मान्सूनपूर्व वादळी पाऊस असेल.

संभाव्य वादळी पाऊस आणि विजांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने शेतकरी बांधवांनी या मान्सूनपूर्व वादळी पावसावर विसंबून राहून किंवा या पाण्यावर अवलंबून राहून मुख्य मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी शेतात पेरणी करण्याची अजिबात घाई करू नये. अन्यथा बियाणे वाया जाण्याची भीती असते. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिक आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच आपल्या पाळीव जनावरांची सुरक्षितता आधी सुनिश्चित करावी. विजेच्या गडगडाटाच्या वेळी चुकूनही मोकळ्या झाडाखाली, टिनशेडखाली (पत्र्याच्या शेडखाली) आसरा घेऊ नये. तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब आणि हायव्होल्टेज विद्युत वाहिन्यांच्या (वीज तारा) जवळ उभे राहणे पूर्णपणे टाळावे. सर्व नागरिकांनी हवामानाच्या या बदलावर लक्ष ठेवून प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button