
“हरित गडचिरोली” च्या निर्मितीसाठी नागरिकांनी योगदान द्यावे – पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे आवाहन, लावलेल्या झाडांच्या नियमित संवर्धनावर पोलिसांचा भर
गडचिरोली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढीला शुद्ध हवा व स्वच्छ पर्यावरण देण्यासाठी ५ जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एक स्तुत्य व भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील एम.आय.डी.सी. मैदानावर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते या विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
‘एक अधिकारी/अंमलदार – एक वृक्ष’ या अनोख्या आणि शिस्तबद्ध संकल्पनेखाली राबविलेल्या या मोहिमेमुळे पोलीस दलाने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला आहे.

आज आयोजित करण्यात आलेल्या या मुख्य कार्यक्रमात विविध प्रकारची मौल्यवान फळझाडे आणि विस्तीर्ण सावली देणारी अशी एकूण २५० मोठी झाडे लावण्यात आली. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दरवर्षी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. या वर्षीच्या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, केवळ शासकीय औपचारिकता म्हणून वृक्षारोपण न करता, लावण्यात आलेल्या सर्व २५० रोपांची नियमित देखभाल, पाणी देणे आणि त्यांचे पूर्ण संवर्धन करून त्यांना मोठे करण्याची लेखी जबाबदारी संबंधित अधिकारी व अंमलदारांवर सोपविण्यात आली आहे.

मुख्यालयातील मुख्य उपक्रमासोबतच, गडचिरोली पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन (पोस्टे), उप-पोलीस स्टेशन (उपपोस्टे) आणि पोलीस मदत केंद्र (पोमके) स्तरावर देखील एकाच वेळी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने भव्य ‘जनजागृती रॅली’ काढण्यात आल्या. या रॅलींमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी व अंमलदारांसह शेकडो सुजाण नागरिकांनी, तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून “झाडे लावा-झाडे जगवा” आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, “पर्यावरण हा मानवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आणि एकमेव आधार आहे. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुपीक जमीन, वनसंपदा आणि जैवविविधता या सर्व गोष्टी आपल्याला केवळ निसर्गामुळेच मोफत उपलब्ध होतात. या पर्यावरणाचे रक्षण करणे ही शासनासोबतच आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, प्रत्येकाने आपल्या घराच्या व शेतीच्या परिसरात किमान एक तरी झाड लावून ‘हरित गडचिरोली’च्या लोकचळवळीत आपले मोलाचे योगदान द्यावे.
या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमास पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी. जे., आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्यासह इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक (रापोनि) अनुजकुमार मडामे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके व त्यांच्या पथकातील सर्व पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले.



