भंडाराविदर्भ

जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! घरगुती गॅस खर्चात होणार २५ टक्क्यांची बचत; पीएनजी पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

सिलेंडरच्या त्रासातून कायमची मुक्ती ; पहिल्या टप्प्यात १५०० घरांना मिळणार जोडणी

भंडारा : वाढत्या महागाईच्या काळात भंडारा जिल्ह्यातील गृहिणी आणि सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात लवकरच पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) सेवा सुरू होणार असून, यामुळे घरगुती गॅसवर होणाऱ्या खर्चात सुमारे २० ते २५ टक्क्यांची मोठी कपात होणार आहे. सध्याच्या एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत ही सेवा अधिक स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे.

एलपीजी सिलेंडरला उत्तम पर्याय म्हणून पीएनजीकडे पाहिले जाते. याचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत: खर्चात बचत: एलपीजीच्या तुलनेत दरमहा सुमारे २०० ते २५० रुपयांची बचत होईल. मीटरनुसार बिलिंग: जितका गॅस वापरला, तितकेच पैसे द्यावे लागतील. यात फसवणुकीला वाव नाही. २४ तास अखंडित पुरवठा: सिलेंडर संपण्याची भीती किंवा नवीन सिलेंडर बुकिंगसाठी वाट पाहण्याची गरज उरणार नाही. जागा वाचते: घरात सिलेंडर ठेवण्यासाठी लागणारी जागा मोकळी होईल.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तुडका येथे कंपनीच्या डेपोचे काम पूर्ण झाले आहे. मोहाडीमार्गे वरठी पर्यंत मुख्य पाईपलाईनचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक बजरंग राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. गॅसचा दाब नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी ‘डिस्ट्रिक्ट रेग्युलेटिंग स्टेशन’ (DRS) उभारले जात आहेत, ज्यामुळे घरांपर्यंत अत्यंत सुरक्षित पद्धतीने गॅस पोहोचवला जाईल.

ग्राहकांना पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी सुरुवातीला केवळ १३०० रुपये अनामत रक्कम (Deposit) भरावी लागेल. उर्वरित ५००० रुपयांची रक्कम ग्राहकांना सोयीनुसार २० बिलिंग सायकलमध्ये (हप्त्यांमध्ये) भरण्याची सवलत देण्यात आली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांवर एकदम आर्थिक भार पडणार नाही.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात साधारणतः १००० ते १५०० घरांना गॅस जोडणी देण्याचे नियोजन आहे. ज्या भागांत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे, तिथे नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. “ही सेवा केवळ स्वस्तच नाही, तर पर्यावरणापूरक आणि अत्यंत सुरक्षित आहे. नागरिकांनी या आधुनिक सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button