गडचिरोलीविदर्भ

ग्रामसेवक कार्यालयीन वेळेतच मद्यधुंद; व्हिडिओ व्हायरल

कार्यालयातच जमिनीवर पडून असल्याचा ग्रामस्थांचा दावा; सरपंच अमोल पुंगाटी यांच्याकडून पंचायत समितीकडे तक्रार, मात्र कारवाईकडे कानाडोळा

चामोर्शी : तालुक्यातील माडे आमगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुरेश पुंगाटी हे कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ८ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयातच ते मद्याच्या नशेत पूर्णपणे झिंगाट झाले होते, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या कथित प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या संतापजनक प्रकारानंतरही संबंधित ग्रामसेवकावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माडे आमगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात विविध दाखले आणि शासकीय कामांसाठी नागरिक आले होते. मात्र, जनतेची कामे सोडून जबाबदार पदावरील ग्रामसेवक सुरेश पुंगाटी हे मद्याच्या नशेत धुंद होऊन कार्यालयातच जमिनीवर पडून होते, असा दावा प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी केला आहे. कार्यालयातील या धक्कादायक स्थितीचे तेथे उपस्थित काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड टीका होत आहे.

ग्रामपंचायत हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाचे आणि विकासाचे केंद्र असते. अशा ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्याचे असे बेजबाबदार वर्तन प्रशासकीय प्रतिमेला काळीमा फासणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून माडे आमगावचे सरपंच अमोल पुंगाटी यांनी तातडीने पंचायत समिती प्रशासनाला या संपूर्ण प्रकरणाची लेखी माहिती दिली.

या बेकायदेशीर प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुहास गाडे आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या मद्यधुंद ग्रामसेवकाला नक्की कोणाचे अभय लाभले आहे? असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.

अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे आणि त्यातच शासकीय अधिकाऱ्यांची अशी बेफिकिरी यामुळे माडे आमगावचे नागरिक कमालीचे संतापले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button