
कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण, संस्थात्मक प्रसूती आणि ग्रामीण रुग्णालयांचे सक्षमीकरण यावर विशेष भर
गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या सर्व राष्ट्रीय आरोग्य योजना प्रभावीपणे पोहोचवून नागरिकांना अत्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. या अनुषंगाने १० जून रोजी येथील के.टी.एस. सामान्य रुग्णालयाच्या मुख्य सभागृहात जिल्ह्याचे राज्य नोडल अधिकारी तथा मुंबई येथील उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या अध्यक्षतेत आणि नागपूर विभागीय उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक उच्चस्तरीय जिल्हास्तरीय आरोग्यविषयक आढावा सभा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली.
या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर तांत्रिक आढावा घेऊन तळागाळातील लोकांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने धोरणात्मक नियोजन व मार्गदर्शन करण्यात आले.
आढावा सभेदरम्यान गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (NHM) अंतर्गत चालणाऱ्या सर्व प्रमुख योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने माता व बाल आरोग्य: माता व बाल संगोपन, संस्थात्मक प्रसुती, जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आणि नियमित लसीकरण मोहिमेला गती देणे. आजार व नियंत्रण मोहीम: हिवताप, क्षयरोग (TB), कुष्ठरोग, सिकलसेल, हत्तीपाय रोग, कुपोषण निर्मूलन, साथरोग नियंत्रण आणि ‘ॲनिमिया मुक्त भारत’ अभियान. आधुनिक सेवा व तंत्रज्ञान: ‘ई-संजीवनी’ पोर्टल, टेलीकन्सल्टेशन, यु-वीन (U-WIN) लसीकरण पोर्टल, स्टेमी (STEMI) हृदयविकार प्रकल्प, पॅलेटिव्ह केअर आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY).
राज्य नोडल अधिकारी डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी आरोग्य विभागाला संबोधित करताना विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या. जिल्ह्यातील १४ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलींना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक (HPV) लसीकरण करून त्यांना भविष्यातील गंभीर आजारांपासून सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच, “दोन कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम जिल्ह्यात व्यापक स्तरावर राबवावी, ग्रामीण रुग्णालयांमधील बेड ऑक्युपन्सी रेट (रुग्ण भरतीचे प्रमाण) वाढवावा आणि सर्व मातांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात दर्जेदार वैद्यकीय सेवा देऊन आरोग्य विभागाचे उद्दिष्ट १००% पूर्ण करावे,” अशा कडक सुचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.
या आढावा सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद कुमार वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. महेंद्र धनविजय, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक मनीष नंदनवार आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी (THO), बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (PHC) वैद्यकीय अधिकारी आणि राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांचे जिल्हा समन्वयक या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी विजय आखाडे, डॉ. संगीता भोयर, डॉ. ललित कुकडे, डॉ. निलेश जाधव, डॉ. स्वप्नील आत्राम, डॉ. सुकन्या कांबळे, डॉ. प्रणीत पाटील, डॉ. संजय माहुले, डॉ. खुशबू महानंदिया, डॉ. नंदा गेडाम, डॉ. विजय पटले, डॉ. प्रशांत तुरकर, डॉ. राहुल शेंडे, डॉ. सचिन उईके, डॉ. गगन गुप्ता, डॉ. आशिष नाईक, डॉ. निकिता पोयाम, डॉ. गुरुप्रकाश खोब्रागडे, डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ. भारती जयस्वाल, अर्चना वानखेडे, उखादास बिसेन आणि मनीष मदने यांच्यासह जिल्हा परिषद आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सर्व कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.



