गडचिरोलीविदर्भ

कृत्रिम MRP वाढीविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे धरणे आंदोलन

अवाजवी नफेखोरी रोखण्यासाठी ‘एसआरपी’ प्रणाली लागू करण्याची मागणी; उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना पाठवले निवेदन

गडचिरोली : दैनंदिन वापराच्या वस्तू, औषधे, बियाणे, कीटकनाशके आणि विविध कृषी निविष्ठांवर कंपन्यांकडून कृत्रिमरीत्या वाढविण्यात येणाऱ्या कमाल किरकोळ किंमतींमुळे (MRP) ग्राहक व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक शोषण होत आहे. या अवाजवी नफेखोरीविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोलीच्या वतीने कारगिल चौकात तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान नागरिकांमध्ये ग्राहक हक्कांबद्दल जनजागृती करण्यात आली आणि त्यानंतर केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यासाठीचे मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी वानखडे यांना सादर करण्यात आले.

१२ जून रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन छेडण्यात आले होते, त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्हा मुख्यालयात हे आंदोलन करण्यात आले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतने निवेदनात म्हटले आहे की, कंपन्या भ्रामक सवलतींचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. यासाठी वस्तूंचा उत्पादन खर्च, वाहतूक खर्च आणि निव्वळ वाजवी नफा यावर आधारित ‘SRP’ (Suggested Retail Price) प्रणाली देशभरात लागू करावी. प्रत्येक वस्तूचा मूळ उत्पादन खर्च सार्वजनिक केला जावा आणि ‘QR कोड’द्वारे ग्राहकांना किंमतीची अचूक माहिती मिळण्याची व्यवस्था करावी.अवाजवी नफेखोरी रोखण्यासाठी संबंधित ग्राहक संरक्षण कायद्यांमध्ये तातडीने कडक सुधारणा करण्यात याव्यात. MRP सुधारणा व किंमत नियंत्रणासंदर्भात शासनाने गठीत केलेल्या अभ्यास समित्यांमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या प्रतिनिधींचा समावेश केला जावा. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कारगिल चौकातील आंदोलनानंतर ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उपजिल्हाधिकारी वानखडे यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर निवेदन सोपवले. धरणे आंदोलनात आणि निवेदन सादर करतेवेळी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष उदय धकाते, प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक विजय कोतपल्लीवार, उपाध्यक्ष विजय साळवे, महिला प्रमुख सुचिता धकाते, प्रा. सुनीता साळवे, एम. डी. मेश्राम, ज्येष्ठ समाजसेवक दिलीप सारडा, नैताम, नरेश काहूरके आणि मनीष हांडे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button