गडचिरोलीविदर्भ

अवैध तंबाखू व दारू विक्रेत्यांवर कारवाईसाठी भरारी पथक सज्ज

देसाईगंज येथे ‘मुक्तिपथ’ तालुका स्तरीय समन्वय समिती बैठक 

गडचिरोली : मुक्तिपथ दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत गुरुवार, ११ जून रोजी देसाईगंज येथील तहसील कार्यालयात तालुका स्तरीय समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डूडूलकर होत्या. या बैठकीत तालुक्यातील अवैध दारू आणि तंबाखू विक्रीला आळा घालण्यासाठी तसेच कोटपा (COTPA) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी एक विशेष ‘भरारी पथक’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बैठकीदरम्यान तालुक्यातील शाळा आणि कॉलेजच्या १०० मीटर परिसरामध्ये होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. यावर अत्यंत कडक भूमिका घेत, तहसीलदार प्रीती डूडूलकर यांनी शाळा व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट व कडक निर्देश पोलीस विभागाला दिले. नवनिर्मित भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, व्यापारी दुकाने, पानठेले आणि इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी आकस्मिक तपासणी केली जाणार आहे. नियमबाह्य वर्तन आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर या पथकाद्वारे थेट कायदेशीर कारवाईची मोहीम राबवली जाईल, अशी चर्चा या बैठकीत सविस्तरपणे करण्यात आली. तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. यासह तालुक्याला दारू व तंबाखुमुक्त करण्यासाठी विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

सभेला नायब तहसीलदार धात्रक, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गोडबोले, विस्तार अधिकारी वि.एस. मुलकलवार, आरोग्य प्रबोधिनी संस्था अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश गभणे, समुपदेशक तारकेश्वरी कांबळे, तेजोमय CMRC माविम अध्यक्ष कुंदा मामीडवार, आरती पुराम, मुक्तिपथ तालुका संघटक लेखाराम हुलके, तालुका प्रेरक हेमंत मेश्राम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button