गडचिरोलीविदर्भ

परिचारिका ठरली ‘देवदूत’; प्रसूतीनंतर हृदयविकाराचा झटका आलेल्या मातेचे वाचवले प्राण!

शस्त्रक्रियेनंतर ५ व्या दिवशी मातेचे हृदयाचे ठोके थांबले; परिचारिका कविता यांच्या धाडसी ‘CPR’ मुळे एक संभाव्य माता मृत्यू टळला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याकडून कौतुक

गडचिरोली : शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी हे केवळ कर्तव्य बजावत नाहीत, तर प्रसंगी ‘देवदूत’ बनून मृत्यूच्या दारात गेलेल्या रुग्णाला परत आणतात, याचेच एक कौतुकास्पद उदाहरण वडसा (देसाईगंज) येथील ग्रामीण रुग्णालयात समोर आले आहे. प्रसूतीपश्चात हृदयविकाराचा झटका आलेल्या एका मातेला तेथील परिचारिकेने अत्यंत तत्परतेने ‘CPR’ देऊन पुनरुज्जीवित केले आणि तिचा जीव वाचवला. या धाडसी कामगिरीमुळे जिल्ह्यातील एक संभाव्य माता मृत्यू टळला असून, संपूर्ण आरोग्य यंत्रणेकडून या वैद्यकीय चमूवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. हीना यांनी या रुग्णालयात एका गरोदर महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली होती. शस्त्रक्रियेनंतरच्या पाचव्या दिवशी अचानक संबंधित महिला रुग्णाला तीव्र झटके आले आणि त्यानंतर काही वेळातच तिचा श्वास व हृदयाचे ठोके थांबले. परिस्थिती अत्यंत गंभीर आणि आणीबाणीची होती. अशा वेळी कर्तव्यावर असलेल्या परिचारिका कविता यांनी अजिबात वेळ न गमावता रुग्णावर तातडीने उपचार सुरू केले. परिचारिका कविता यांना यापूर्वी नामांकित कार्डियाक हॉस्पिटलमध्ये (हृदयविकार रुग्णालय) काम करण्याचा अनुभव व प्रशिक्षण असल्याने, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला तत्परतेने CPR देण्यास सुरुवात केली. त्यांच्या अत्यंत अचूक आणि वेगवान उपचारामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर झाली आणि तिला जीवदान मिळाले.

वडसा ग्रामीण रुग्णालयात पूर्वी सिझेरियन शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली डॉ. हीना यांची तिथे नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या रुग्णालयात आता दरमहा ५ ते १० सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडू लागल्या आहेत, ज्याचा मोठा लाभ स्थानिक नागरिकांना मिळत आहे. प्रकृती स्थिर झाल्यानंतर रुग्ण महिलेला अधिकच्या उपचारांसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिसार आणि डॉ. हीना यांच्या देखरेखीखाली गडचिरोली जिल्हा रुग्णालयात सुरक्षितपणे संदर्भित करण्यात आले.

या अभिमानास्पद कामगिरीबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या, “वडसा ग्रामीण रुग्णालयात डॉ. हीना यांच्या नियुक्तीमुळे आपण सिझेरियन सेवा सुरू करू शकलो, याचा आनंद आहेच. पण परिचारिका कविता यांनी दाखवलेले प्रसंगावधान अत्यंत कौतुकास पात्र आहे. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एक माता मृत्यू रोखला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिसार, डॉ. हीना आणि विशेषतः परिचारिका कविता यांचे मी अभिनंदन करते. अशा समर्पित कर्मचाऱ्यांमुळेच शासकीय आरोग्य सेवेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो.”

सध्या संबंधित मातेची प्रकृती स्थिर असून, जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत. परिचारिकेच्या या तत्परतेमुळे एका चिमुरड्याचा आधार असलेल्या मातेचे आयुष्य सुरक्षित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button