
विरोधी पक्षाच्या आमदारांना तोकडा निधी देऊन सरकारकडून दुजाभावचा आरोप ; रस्त्याचे काम न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा
देसाईगंज : गेल्या अनेक महिन्यांपासून वडसा (देसाईगंज) ते अर्जुनी (जि. गोंदिया) या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गाची झालेली दुरवस्था तसेच रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात रविवारी संध्याकाळी तीव्र जनक्षोभ उसळला. या मार्गाच्या तातडीने दुरुस्तीसाठी विरोधी पक्षाचे आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात वडसा-अर्जुनी टी-पॉईंट येथे भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त नागरिकांनी सरकारच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, वाहनचालक, महिला आणि विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनादरम्यान नागरिकांना संबोधित करताना आमदार रामदास मसराम यांनी सरकारवर सडकून टीका केली. “वडसा-अर्जुनी मार्ग हा शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की नागरिकांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आम्ही अनेकदा निधीची मागणी केली, परंतु सरकारमधील आमदारांना भरीव निधी दिला जातो आणि विरोधी पक्षांतील आमदारांना तोकडा निधी देऊन दुजाभाव केला जातो,” असा थेट आरोप त्यांनी केला. जनतेचा संताप शासनापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे आंदोलन करावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी आमदार रामदास मसराम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून (मोबाईल) थेट संपर्क साधला. चालू वर्षाच्या बजेटमध्ये या रस्त्यासाठी विशेष निधी मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर रस्त्याचे काम लवकर सुरू न झाल्यास जनतेला सोबत घेऊन आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आ. मसराम यांनी प्रशासनाला दिला.
या रास्ता रोको आंदोलनामुळे वडसा-अर्जुनी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळासाठी स्थानबद्ध केले. त्यानंतर आंदोलन समाप्त होऊन या मार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली.
या आंदोलनात काँग्रेस कमिटीचे देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी उपसभापती नितीन राऊत, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमाला पेंदाम, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, नगरसेवक तथा गटनेता विकास प्रधान, नगरसेविका आशा दहिवले, फेमिदा पठाण, मंदा समर्थ, हंसराज लांडगे, इलियास पठाण, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर भर्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



