
सन २०२० ते २०२६ मधील ८५ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाची विल्हेवाट; पोंभूर्णा पोलिसांची मोठी कारवाई
चंद्रपूर : पोंभूर्णा पोलीस स्टेशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने एक मोठी कारवाई केली आहे. मागील सहा वर्षांत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल १४ लाख ५८ हजार ५१० रुपये किमतीचा अवैध देशी व विदेशी दारूचा साठा जाहीरपणे नष्ट करण्यात आला. पोलीस स्टेशनसमोरील मुख्य सिमेंट रस्त्यावर जप्त केलेल्या दारूच्या हजारो बाटल्या मांडून त्यावर थेट ‘रोड रोलर’ फिरवून हा संपूर्ण साठा उद्ध्वस्त करण्यात आला.
सन २०२० ते २०२६ या ६ वर्षांच्या कालावधीत पोंभूर्णा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये एकूण ८५ गुन्हे नोंदवण्यात आले होते. या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांनी अधिकृत आदेश जारी केले होते. या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली. नष्ट करण्यात आलेल्या साठ्यामध्ये ३९४ पेट्या व ११ किरकोळ देशी दारूच्या बाटल्या, तसेच ५ पेट्या व ६ किरकोळ विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश होता, ज्यांची एकूण सरकारी किंमत १४,५८,५१० रुपये होती.
रोड रोलर फिरवून दारूच्या बाटल्या नष्ट केल्यानंतर, परिसरात काचा पसरून कोणाला इजा होऊ नये म्हणून सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली. जवानांनी रस्त्यावरील सर्व फुटलेल्या काचा आणि रिकामे प्लास्टिकचे क्रेट्स गोळा करून एका मोठ्या खड्ड्यात सुरक्षितपणे गाडून नष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी अधिकृत पंचनामा करण्यात आला, तसेच संपूर्ण कारवाईचे छायाचित्रण आणि व्हिडिओ शूटिंगही करण्यात आले. या कारवाईची रीतसर नोंद पोंभूर्णा पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये करण्यात आली आहे.
सदर मोहीम चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मुल) सत्यजित आमले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईच्या वेळी पोंभूर्णाचे ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजुरा येथील दुय्यम निरीक्षक एस. टी. धीडसे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि अधिकृत पंच प्रामुख्याने उपस्थित होते.



