गडचिरोलीविदर्भ

हेडरी व कोनसरी येथे लॉयड्स समर कॅम्प २०२६ ; ४६५ हून अधिक बालकांचा उत्स्फूर्त सहभाग

लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन व लॉयड्स मेटल्सचा संयुक्त स्तुत्य उपक्रम; क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनकौशल्याचे विद्यार्थ्यांना मिळाले धडे

गडचिरोली : दुर्गम भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समुदाय सशक्तीकरणासाठी आपली बांधिलकी अधिक दृढ करत, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ (LMEL) यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी आणि कोनसरी येथे ‘लॉयड्स समर कॅम्प २०२६’ चे यशस्वी आयोजन केले होते. शालेय शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मुलांना नव्या गोष्टींचा शोध घेण्याची आणि स्वतःमधील कलागुणांना वाव देण्याची सुवर्णसंधी या १० दिवसांच्या शिबिरातून उपलब्ध झाली.

या समर कॅम्पमध्ये परिसरातील विविध गावांमधील ४६५ हून अधिक मुलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला. हेडरी येथे ५ ते १४ जून २०२६ दरम्यान आयोजित कॅम्पमध्ये २६५ विद्यार्थ्यांनी, तर कोनसरी येथे ६ ते १२ जून २०२६ दरम्यान झालेल्या कॅम्पमध्ये २०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाच्या उद्देशाने या शिबिराची आखणी करण्यात आली होती. रोज सकाळी वॉर्म-अप व्यायामाने सुरुवात झाल्यानंतर कला व हस्तकला, चित्रकला, नृत्य, योग, झुंबा, इनडोअर-आऊटडोअर खेळ आणि टीम-बिल्डिंग उपक्रम घेतले गेले. विशेष म्हणजे, सहभागी मुलांना कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, ॲथलेटिक्स आणि तिरंदाजी या खेळांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींचे व्यवस्थापन कसे करावे, याचे व्यावहारिक धडेही जवानांनी व प्रशिक्षकांनी मुलांना दिले.

आजच्या काळातील गरज ओळखून या शिबिरात मुलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘गुड टच-बॅड टच’, अग्निसुरक्षा, प्रथमोपचार (First Aid) आणि ‘सीपीआर’ (CPR) चे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, आत्मविश्वास वृद्धी आणि शिस्त यांवर आधारित व्यक्तिमत्त्व विकास सत्रांनी मुलांचा शिकण्याचा अनुभव अधिक समृद्ध केला.

आसपासच्या ग्रामीण भागातील मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी लॉयड्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली विशेष वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच सर्व सहभागी मुलांच्या आरोग्याची काळजी घेत दररोज पौष्टिक नाश्ता आणि अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

कॅम्पचा समारोप अत्यंत रंगतदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या समारंभाला स्थानिक ग्रामप्रतिनिधी, मान्यवर, पालक आणि लॉयड्सचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धांतील विजेत्या बालकांचा विशेष सत्कार करण्यात आला, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

शिक्षण आणि मनोरंजनाचा उत्कृष्ट संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमामुळे गडचिरोलीच्या सामाजिक आणि भावी पिढीच्या विकासात लॉयड्सने पुन्हा एकदा आपले महत्त्वपूर्ण योगदान सिद्ध केले आहे.

“मुलांमध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे गडचिरोलीच्या भविष्यात केलेली गुंतवणूक आहे. समर कॅम्पचा उद्देश मुलांना शिकण्याच्या, आत्मविश्वास वाढविण्याच्या आणि आवश्यक जीवनकौशल्ये विकसित करण्याच्या संधी देणे हा होता. ग्रामीण भागातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायी असून पुढील पिढीच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आम्ही अशा अर्थपूर्ण व्यासपीठांची निर्मिती करत राहू.”

— बी. प्रभाकरन (व्यवस्थापकीय संचालक, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button