
तिसऱ्या मित्राने प्रसंगावधान राखत गावात दिली माहिती, मात्र चिमुकल्यांना वाचवण्यात अपयश
भद्रावती : तालुक्यातील पाचगाव येथे बुधवार, २४ जून रोजी एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शेतातील फवारणीसाठी करून ठेवलेल्या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात बुडून दोन निष्पाप चिमुकल्यांचा करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातून तीव्र हळहळ व्यक्त होत असून, मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कार्तिक संदीप सावसाकडे (वय १२ वर्ष) आणि सानिध्य विजय दधनकर (वय १० वर्ष, दोन्ही रा. पाचगाव) अशी मृत मुलांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, बुधवार रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास कार्तिक आणि सानिध्य हे आपल्या गावातीलच आदित्य बालू राऊत (वय १२ वर्ष) या तिसऱ्या मित्रासोबत घरून खेळण्यासाठी बाहेर पडले होते. खेळता खेळता हे तिघेही मित्र इरई धरण परिसरातील एका शेताजवळ पोहोचले. तिथे कापूस व इतर पिकांवर फवारणी करण्यासाठी पाण्याचा मोठा साठा करून एक खड्डा तयार करण्यात आला होता. खड्ड्यात पाणी पाहताच या लहान मुलांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि तिघेही पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने कार्तिक आणि सानिध्य या दोघांचा अचानक तोल गेला आणि ते खोल पाण्यात बुडू लागले.
आपले दोन जिवलग मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या आदित्यने त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्याचा प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे आणि मित्र पाण्यात गडप होत असल्याचे लक्षात येताच, आदित्यने अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत थेट गावाच्या दिशेने धाव घेतली. त्याने गावात पोहोचून तात्काळ गावकऱ्यांना या भीषण घटनेची माहिती दिली.
आदित्यने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गावकऱ्यांनी कोणतीही वेळ न गमावता तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी खड्ड्यातील पाण्यात शोधमोहीम राबवून काही वेळातच कार्तिक आणि सानिध्य या दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता, दोघेही गतप्राण झाले होते. खेळायला गेलेली मुले थेट मृत अवस्थेतच परत आल्याचे पाहून पालकांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे संपूर्ण पाचगाव गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.



