गोंदियाविदर्भ

धावत्या ‘दुरंतो एक्सप्रेस’मध्ये मातेची सुखरूप प्रसूती; आरोग्य सेविका ठरली ‘देवदूत’!

आरोग्य सेविका राजश्री भोंडे (नेवारे) यांचे धाडस; रेल्वे प्रवासात निर्माण झालेल्या आणीबाणीच्या प्रसंगात माता आणि बाळाला दिले जीवदान

गोंदिया : कर्तव्याची हाक आणि वेळेचे गांभीर्य ओळखले, तर धावत्या ट्रेनमध्येही चमत्कार घडू शकतो, याचेच एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण नुकतेच समोर आले आहे. नागपूर-मुंबई दुरंतो सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये एका गरोदर मातेला अचानक तीव्र प्रसूती कळा येऊ लागल्या. पुढील स्टेशन येण्यास बराच वेळ असल्याने निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर परिस्थितीत त्याच ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या गोंदियाच्या आरोग्य सेविका राजश्री भोंडे (नेवारे) यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि तत्परतेमुळे धावत्या ट्रेनमध्येच एका गोंडस बाळाचा सुरक्षित जन्म झाला आहे. या घटनेने भोंडे सिस्टर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

२४ जून रोजी नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस जळगाव स्टेशनच्या पुढे प्रवास करत असताना, ट्रेनमधील एका गरोदर महिला प्रवाशाला अचानक तीव्र वेदना व प्रसूती कळा सुरू झाल्या. पुढील स्टेशन येण्यास मोठा अवधी असल्याने नातेवाईक आणि प्रवासी हवालदिल झाले होते. नेमकी हीच परिस्थिती गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र काटी अंतर्गत उपकेंद्र ‘मरारटोला’ येथे कार्यरत असणाऱ्या ए.एन.एम. (ANM) राजश्री भोंडे यांनी पाहिली. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता रुग्ण महिलेकडे धाव घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या जबाबदारीवर मदतीचा पुढाकार घेतला.

धावत्या ट्रेनमध्ये प्रसूतीसाठी आवश्यक असणारी पूर्ण वैद्यकीय साधने उपलब्ध नव्हती. तरीही, आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर भोंडे सिस्टर यांनी कोणतीही वैद्यकीय गुंतागुंत होऊ न देता अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने महिलेची प्रसूती पार पाडली. त्यांच्या या समयसूचकतेमुळे आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचले. प्रसूतीनंतर लगेच रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून चाळीसगाव स्टेशनवर रुग्णवाहिका (१०८) सज्ज ठेवण्यात आली होती. माता व बाळाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या दोघेही सुखरूप आहेत.

आरोग्य सेविका राजश्री भोंडे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे आणि माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. “संकटसमयी दाखवलेली ही तत्परता संपूर्ण आरोग्य कर्मचारी वर्गासाठी अभिमानास्पद असून त्यांनी जनसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे,” अशा भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

प्रवासादरम्यान निर्माण झालेल्या या आणीबाणीच्या प्रसंगात भोंडे सिस्टर यांनी दाखवलेले ‘देवदूत’ रूप पाहून रेल्वेतील इतर प्रवाशांनीही त्यांच्या धाडसाचे मनापासून कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button