
धानोरा : तालुक्यातील खेडी येथे मुक्तीपथ अभियान आणि स्थानिक गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तीपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावाला संपूर्णपणे व्यसनमुक्त करणे आणि गाव संघटना अधिक बळकट करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या मॅरेथॉनमध्ये गावातील २६ महिला व पुरुषांनी उत्स्फूर्तपणे धावत व्यसनाविरोधात लढा देण्याची तयारी दर्शविली तर संपूर्ण गावाने या उपक्रमाला पाठिंबा दिला.
मॅरेथॉनपूर्वी खेडी येथे मुक्तीपथच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत गावातील दारूच्या व्यसनाची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. गावच्या सर्वांगीण विकासासाठी दारूबंदी का आवश्यक आहे, ही बाब मुक्तीपथच्या चमूने ग्रामस्थांना पटवून दिली. गावातून अवैध दारू पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि युवकांनी गाव संघटनेला सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोहिमेचा एक भाग म्हणून गावात व्यसन उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, गावातील १७ रुग्णांनी उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला. त्यानंतर आयोजित मॅरेथॉनमध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित अवैध व्यवसायापासून गावाला मुक्त करण्याचे ठरविले आहे.
यावेळी मुक्तीपथचे सहसंचालक संतोष सावळकर, सर्चचे गणेश कुळमेथे, पोलीस पाटील जीवनदास उसेंडी, गाव संघटनेच्या ज्योती कुमोटी, चंद्रकांत होळी, सुरेखा होळी यांच्यासह गाव संघटनेच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तीपथचे धानोरा तालुका संघटक राहुल महाकुलकर आणि स्पार्क कार्यकर्ती मयुरी चिचघरे यांनी नियोजन केले. गावाला व्यसनमुक्त करण्यासाठी संघटनेत जास्तीत जास्त नवीन सदस्य जोडण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी केला.



