पोलीस दलाचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’; ५ लाखांची अवैध दारू जप्त, १३९ गुन्हेगारांची झडती

उपविभागात ६ तास चालले कोंबिंग ऑपरेशन ; ३०० वाहनांची तपासणी तर हॉटेल्स, लॉजेसवर पोलिसांचे छापे, गुन्हेगारांचे धाबे दणाणले
गडचिरोली : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच दारू, गुटखा यांसारख्या अवैध व्यवसायांना समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बुधवार, २४ जून रोजी गडचिरोली उपविभागात विशेष ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी ५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त केला आहे.
२४ जून रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल ६ तास सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वात हे ‘ऑपरेशन ऑल आऊट’ आणि ‘कोंबिंग ऑपरेशन’ चालले. गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात आली. तीनही पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपापल्या हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यामध्ये दारूच्या अवैध धंद्यांवर एकूण १३ कारवाया करण्यात आल्या असून ५,००,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयित व्यक्ती आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. यादरम्यान पोलीस दलाच्या वेगवेगळ्या पथकांनी हद्दीतील तब्बल १३९ सराईत व अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) गुन्हेगारांची प्रत्यक्ष तपासणी केली. तसेच सार्वजनिक सुरक्षेचा उपाय म्हणून शहरातील विविध हॉटेल्स, लॉजेस आणि निर्जन स्थळांची कसून झडती घेण्यात आली. लॉजमधील नोंदवह्या, ग्राहकांची ओळखपत्रे आणि तिथे वास्तव्य करणाऱ्या संशयितांची माहिती यावेळी पडताळण्यात आली.
अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपविभागात ठिकठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयास्पद वाटणाऱ्या एकूण ३०० वाहनांची कसून तपासणी केली. त्यापैकी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि संशयास्पद आढळलेल्या ४० वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस दलाच्या या अचानक आणि व्यापक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.
सदर मोहीम पोलीस अधीक्षक एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते आणि चामोर्शीचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्यासह तिन्ही ठाण्यांतील सर्व अधिकारी व अंमलदारांनी मोलाची कामगिरी बजावली.
“भविष्यात देखील अशी विशेष मोहीम राबवून अवैध धंदेवाल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अवैध व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती व समाजविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे.”
— एम. रमेश (पोलीस अधीक्षक, गडचिरोली)



