क्राईमगोंदियाविदर्भ

चारित्र्याच्या संशयातून प्रियकरानेच केला ‘त्या’ महिलेचा खून

गोंदियातील महिला हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा; मध्यप्रदेशचा प्रियकर गजाआड

गोंदिया : शहरालगतच्या सूर्याटोला रेल्वे चौकी परिसरात सोमवार, २२ जून रोजी रेल्वे रुळांच्या दरम्यान एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याच्या थरारक घटनेचा छडा लावण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याच्या संशयातून प्रियकरानेच हा अंगावर काटा आणणारा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन जिल्ह्यातील बैसलखुर्द येथील रहिवासी बिरेंद्र आसाराम परमार (वय ३४) या नराधम प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. शालू जोशीराम नंदेश्वर (वय ३८, रा. दुर्गुटोला, सालेकसा, जि. गोंदिया) असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, मृत शालू नंदेश्वर हिने यापूर्वी इंदूर येथील एका व्यक्तीशी प्रेमविवाह केला होता. मात्र, तिच्या पतीचे सात महिन्यांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनापूर्वीपासून, म्हणजेच गेल्या दीड वर्षापासून तिचे आरोपी बिरेंद्र परमार याच्याशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, शालूचे इंदूरमधीलच आणखी एका व्यक्तीशी सूत जुळले असल्याचा संशय बिरेंद्रला आला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार कडाक्याचे वाद होत होते. या संतापाच्या भरात महिनाभरापूर्वी बिरेंद्रने शालूचे नाक कापल्याचा धक्कादायक प्रकारही घडला होता. तरीही तिचा संशय कायम राहिल्याने बिरेंद्रने तिचा काटा काढण्याचा क्रूर कट रचला.

१५ दिवसांपूर्वी शालू सालेकसा जवळील दुर्गुटोला येथील आपल्या माहेरी आली होती. कटानुसार, आरोपी बिरेंद्र इंदूरहून रेल्वेने सालेकसा येथे पोहोचला आणि त्याने फोन करून शालूला सालेकसा रेल्वे स्थानकावर भेटायला बोलावले. शालूचा भाऊ तिला दुचाकीने स्थानकावर सोडून परत गेला. त्यानंतर दोघेही लोकल रेल्वेने गोंदियाकडे येण्यासाठी निघाले. रविवारी रात्री गोंदिया स्थानकाजवळ सिग्नल न मिळाल्यामुळे रेल्वे आऊटरला थांबली. रेल्वे थांबताच संधी साधून बिरेंद्रने शालूला खाली उतरवले आणि आपल्या बॅगेत लपवून आणलेल्या धारदार चाकूने तिचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. हा प्रकार रेल्वे अपघात वाटावा, या उद्देशाने त्याने तिचा मृतदेह दोन रेल्वे रुळांच्या मधोमध टाकला आणि तो रात्रीच्या अंधारात पसार झाला.

सोमवारी सकाळी रुळांच्या मध्ये महिलेचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळल्याने रेल्वे पोलिसांसह शहरात खळबळ उडाली होती. मृतदेहाचा चेहरा विद्रूप झाल्याने सुरुवातीला ओळख पटवणे कठीण होते. रामनगर पोलिसांनी मृत महिलेच्या अंगावरील कपड्यांचे फोटो आणि माहिती सर्वत्र प्रसारित केली. सालेकसा स्थानकावर बहिणीला सोडायला गेलेल्या शालूच्या भावाने पोलिसां कडील शोधपत्रिका पाहिली आणि ज्या कपड्यांमध्ये बहिणीला सोडले होते, त्याच कपड्यांवरून तिची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्र फिरवून आरोपी बिरेंद्र परमार याला हुडकून काढले व त्याला अटक केली. रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button