भंडाराविदर्भ

एसटी बस थेट नालीत ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी थोडक्यात बचावले

नव्याने केलेल्या नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप; तातडीने चौकशी करण्याची मागणी

तुमसर : शहरातील तुमसर-गोंदिया बायपास मार्गावर नव्याने करण्यात आलेल्या नालीच्या बांधकामामुळे शुक्रवार, २७ जून रोजी एक मोठी दुर्घटना घडता घडता टळली. तुमसर आगाराची प्रवाशांनी भरलेली एसटी बस या मार्गावरून जात असताना, बसची मागची दोन्ही चाके थेट नालीत रुतली. सुदैवाने, बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि बसमधील सुमारे ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातग्रस्त बस तुमसर आगाराची असून तिचा क्रमांक एमएच १३ सीयू ८३३८ असा आहे.

सविस्तर वृत्त असे की, तुमसर येथून ३० ते ३५ प्रवाशांना घेऊन ही नियमित एसटी बस गोंदियाकडे जाण्यासाठी निघाली होती. तुमसर-गोंदिया बायपास मार्गावरून जात असताना, रस्त्यालगत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अलीकडेच बांधण्यात आलेल्या नालीच्या भागावरून बस जात होती. मात्र, बसचा भार पडताच अचानक नालीचा वरचा भाग खचला आणि बसची चाके खोलवर रुतली. यामुळे बस एका बाजूला तीव्र गतीने झुकली.

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात घडला, त्या नालीलगतच नागरिकांची निवासी घरे आहेत. जर ही बस अधिक खोलवर सरकली असती किंवा उलटली असती, तर ती थेट नागरिकांच्या घरांवर कोसळली असती. यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. धोका ओळखून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यास मदत केली.

या थरारक घटनेनंतर नुकत्याच करण्यात आलेल्या नाली बांधकामाच्या दर्जाबाबत परिसरात गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लाखो रुपये खर्चून केलेले हे बांधकाम इतके निकृष्ट किंवा सदोष होते का, की एका वाहनाचा भारही ते सहन करू शकले नाही? अशी संतप्त चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारची कामे प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखीला घ्यावी आणि बायपास मार्गावरील नाली बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी तुमसरच्या नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button