
गडचिरोली : तालुक्यातील पोर्ला गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घेतला आहे. नुकतेच तंमूस, पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या कृती करीत एका विक्रेत्याच्या घरातून 130 नग देशी दारू जप्त करीत विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. विजय भोयर असे आरोपी विक्रेत्याचे नाव आहे.
गडचिरोली तालुक्यातील पोर्ला हे गाव मुख्य ठिकाण आहे. येथे जवळपास 7 ते 8 दारूविक्रेत्यांच्या माध्यमातून चोरट्या मार्गाने अवैध विक्री केली जाते. गावातील दारूविक्री थांबविण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे कधी बंद कधी सुरू अशी दारूविक्रीची सद्यस्थिती आहे. अशातच ग्रामपंचायत सभागृहात तंटामुक्त समितीची बैठक पार पडली. यात अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, पोलिस व मुक्तिपथ टीमने संयुक्त कृती करीत 7 दारूविक्रेत्यांच्या घरी तपासणी केली असता एका घरी 130 नग देशी दारू मिळून आली. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर विक्रेत्याना अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याची तंबी देण्यात आली.
ही कारवाई पोलिस कर्मचारी विनोद रणदिवे, वेलादी यांनी केली. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष गोपाल गेडाम, माजी अध्यक्ष रवींद्र सेलोटे, भास्कर मेश्राम, पोलिस पाटील हितेंद्र बरसगाडे, सदस्य अशोक खोब्रागडे, तंटामुक्त समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, मुक्तिपथचे रेवनाथ मेश्राम, मेघा गोवर्धन आदी उपस्थित होते.



