
‘बफर’ क्षेत्रातील सर्व पर्यटन गेट आणि पर्यटन संकुले नियमितपणे सुरू राहणार ; उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पियुषा जगताप यांची माहिती
भंडारा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा (NNTR) आनंद घेणाऱ्या निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, व्याघ्र प्रकल्पाच्या ‘कोअर’ (गाभा) क्षेत्रातील जंगल सफारी आणि पर्यटन संकुल १ जुलै २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, पर्यटकांचा हिरमोड होणार नसून व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर’ क्षेत्रातील सर्व पर्यटन गेट आणि पर्यटन संकुले नियमितपणे सुरू राहणार आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पियुषा जगताप यांनी दिली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वन्यजीवांचा विणीचा हंगाम आणि जंगलातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन कोअर क्षेत्र पर्यटनासाठी बंद ठेवले जाते. यंदाच्या वर्षासाठी वनविभागाने सुरुवातीला १५ जून ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोअर क्षेत्र बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १६ जूनपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन आरक्षण सुविधाही बंद करण्यात आली होती.
परंतु, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी नंतर एक सुधारित आदेश जारी केला. या नव्या आदेशानुसार १५ जूनऐवजी ३० जून २०२६ पर्यंत कोअर क्षेत्रातील पर्यटन सुरू ठेवण्यास विशेष मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना ३० जूनपर्यंत नागझिराच्या कोअर जंगलात सफारीचा आनंद घेता आला. वार्षिक मार्गदर्शक सूचनांचे पालन करत अखेर १ जुलैपासून कोअर क्षेत्रातील सफारी पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्यात आली आहे. मात्र, वन्यजीव पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी बफर क्षेत्राचे दार उघडे ठेवण्यात आले आहे.
“पावसाळी हंगामातील नियमांनुसार १ जुलैपासून कोअर क्षेत्रातील निसर्ग पर्यटन आणि संकुले बंद करण्यात आली असली, तरी बफर क्षेत्रातील गेट्स सुरू आहेत. पर्यटकांनी या बदललेल्या नियमांची नोंद घेऊन आपल्या सफारीचे नियोजन करावे.” असे आवाहन पियुषा जगताप (उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प) यांनी केले आहे.



