
नांदोरी टी-पॉईंट परिसरात एलसीबीची धडक कारवाई
चंद्रपूर: जिल्ह्यातील अवैध दारू तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदोरी टी-पॉईंट परिसरात सापळा रचून पोलिसांनी तब्बल ५ लाख १५ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा आणि एका कारचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
जिल्ह्यात अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, ३० जून रोजी एलसीबीच्या वरोरा पथकाला नांदोरी टी-पॉईंट परिसरातून एका कारमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ परिसरात तटबंदी करत संशयित वाहनाची प्रतीक्षा केली. काही वेळातच तेथे संशयास्पदरित्या येणारी एक ‘टोयोटा एटिओस’ कार पोलिसांना दिसली. पोलिसांनी कार थांबवून तिची कसून झडती घेतली असता, पोलिसांना कारमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा लपवून ठेवलेला आढळून आला.
पोलिसांनी कारमधून विदेशी दारूच्या एकूण २९ पेट्या जप्त केल्या. या पेट्यांमध्ये ७५० मिली क्षमतेच्या एकूण ३५३ बाटल्या होत्या, ज्यांची बाजारपेठीय किंमत अंदाजे १ लाख ८३ हजार ८५८ रुपये आहे. दारूच्या साठ्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ३ लाख रुपये किमतीची टोयोटा एटिओस कार आणि ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख १५ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईत नरेंद्र जितेंद्र भाट (वय ३१) आणि दामिनी नरेंद्र भाट, दोघेही रा. जलनगर, चंद्रपूर, यांना पोलिसांनी अटक केली. कारवाई दरम्यान या प्रकरणातील तिसरा आरोपी सूर्य उर्फ सूरज परसंगी हा पोलिसांना चकमा देऊन घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी आरोपींविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि वरोरा पोलीस संयुक्तपणे करत असून, ही दारू कुठून आणली जात होती आणि ती कोणाला पुरवली जाणार होती, याचा शोध घेतला जात आहे.



