
अपघाताच्या गुन्ह्यातील दोषारोपपत्राची प्रत देण्यासाठी पोलिसाकडूनच लाचेची मागणी ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नागपूर : न्यायालयात सादर करण्यासाठी अपघाताच्या गुन्ह्यातील दोषारोपपत्राची (चार्जशीट) प्रत देण्याच्या मोबदल्यात ३ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या गणेशपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (१ जुलै) रंगेहाथ अटक केली. अतिष निकोडे असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे, लाच मागणारा आणि लाच देणारा तक्रारदार हे दोघेही पोलीस दलातच कार्यरत असल्याने या कारवाईमुळे नागपूर पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे स्वतः पोलीस विभागात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ते कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला होता. याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अतिष निकोडे यांच्याकडे होता. दरम्यान, अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात केस दाखल केली होती. न्यायालयात सादर करण्यासाठी त्यांना या अपघाताच्या गुन्ह्यातील दोषारोपपत्राची (चार्जशीट) अत्यंत गरज होती. ही प्रत मिळवण्यासाठी जेव्हा तक्रारदार हवालदार निकोडे यांना भेटले, तेव्हा निकोडे यांनी त्यांच्याकडेच ३,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
सहकाऱ्याकडूनच लाचेची मागणी झाल्याने संतप्त झालेल्या तक्रारदार पोलिसाने लाच देण्याचे नाकारले आणि थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नागपूर गाठून रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने १ जुलै रोजी पडताळणी केली. यावेळी आरोपी हवालदार अतिष निकोडे याने तक्रारदाराकडे चार्जशीटच्या प्रतीसाठी एकूण ५,००० रुपयांची मागणी करून, त्यातील पहिला हप्ता म्हणून ३,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. एसीबीच्या पथकाने गणेशपेठ पोलीस स्टेशन परिसरातच सापळा रचला. तक्रारदाराकडून ३,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने हवालदार अतिष निकोडे याला रंगेहाथ पकडले.
लाचखोर पोलीस हवालदार अतिष निकोडे याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस हवालदार आशिष वैद्य, विलीन तांबडे, पोलीस शिपाई होमेश्वर वाईलकर, प्रफुल भातुलकर, स्वाती हिंडोरिया आणि चालक पोलीस हवालदार राजेंद्र जांभुळकर यांनी केली.



