गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोली पोलिसांच्या शौर्याचा सन्मान ; ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी ‘वेगवर्धित पदोन्नती’

मुंबईत पार पडला विशेष ‘पिपिंग’ समारंभ; पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते गौरव

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी, धाडसी कारवाया आणि शौर्य गाजवणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या (सपोनि) कार्याची गृह विभागाने विशेष दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून या पाचही अधिकाऱ्यांना ‘पोलीस निरीक्षक’ पदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. या निमित्ताने ३ जुलै रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे अत्यंत दिमाखदार ‘पिपिंग समारंभ’ पार पडला.

गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादप्रभावित जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून, इतर सहकाऱ्यांनाही यामुळे उत्कृष्ट कामगिरीची प्रेरणा मिळणार आहे.

या दिमाखदार सोहळ्यात राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पदोन्नतीप्राप्त पाचही पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्हे लावून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये सपोनि. योगिराज जाधव, सपोनि. सचिन झनक, सपोनि. बाबासाहेब दुधाळ, सपोनि. सुनील बागल, सपोनि. राहुल देव्हडे यांचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक करत म्हटले की, “पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान होत असल्याने सेवेत गुणवत्ता, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेला अधिक बळ मिळते.” यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत माओवाद विरोधी अभियानादरम्यान आलेले अनुभव, आव्हाने आणि त्यांची कार्यपद्धती जाणून घेतली. तसेच दुर्गम भागातील त्यांच्या कामगिरीची पाठ थोपटली.

गडचिरोली पोलीस दलाने आजवर देशात आणि राज्यात आपल्या शौर्याचा मोठा ठसा उमटवला आहे. दलाला आतापर्यंत ०३ शौर्य चक्र, ०६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, ३३८ पोलीस शौर्य पदक, २० गुणवत्ता सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, १५१० मा. पोलीस महासंचालक पदक मिळाले असून, तब्बल NDA / ४०४ पोलीस अधिकारी व अंमलदारांना आतापर्यंत वेगवर्धित पदोन्नती मिळाली आहे.

या विशेष समारंभाला राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अपर पोलीस महासंचालक (एटीएस) नवल बजाज, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. निखिल गुप्ता, आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग शिरीष जैन, अपर पोलीस महासंचालक (सायबर) यशस्वी यादव, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सागर पाटील, पोलीस अधीक्षक (डायल ११२) प्रशांत मोहिते आणि गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही आपल्या जिल्ह्यातील पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पदोन्नतीमुळे गडचिरोली पोलीस दलाचे मनोबल निश्चितच उंचावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button