
गडचिरोली : वधूच्या घरी लग्नाची लगबग सुरू होती. अंगणात मांडव सजला होता, अक्षतांची तयारी झाली होती आणि लग्न लावण्यासाठी बोहलाही सज्ज होता. तिकडे नवरदेवाच्या घरीही हळदीचा कार्यक्रम आटोपून १ जुलै रोजी वरात घेऊन निघण्याची जय्यत तयारी झाली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी, ३० जूनच्या सायंकाळी ५ वाजता अचानक शासकीय गाडी वधूच्या दारात येऊन धडकली आणि क्षणार्धात विवाह सोहळ्याच्या आनंदाचे रूपांतर सन्नाट्यात झाले. चामोर्शी तालुक्यात प्रशासनाने अत्यंत वेगाने हालचाली करत एका अल्पवयीन बालिकेचा होणारा बालविवाह ऐनवेळी रोखला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनाखाली बाल संरक्षण कक्षाने मंगळवारी ही धडक कारवाई केली. चामोर्शी तालुक्यातील एका गावात १८ वर्षांखालील बालिकेचे लग्न लावून दिले जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, कवेश्वर लेनगुरे आणि निलेश देशमुख यांच्या पथकाने कोणताही वेळ न घालवता थेट गावाकडे धाव घेतली आणि विवाह सोहळा थांबवला.
अचानक शासकीय पथक दारात आल्याने लग्नघरातील वऱ्हाडी आणि नातेवाईक थक्क झाले. बाल संरक्षण कक्षाच्या चमूने तात्काळ अल्पवयीन बालिका आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन केले. “बालविवाह हा कायद्याने अत्यंत गंभीर गुन्हा असून, यामुळे मुलीच्या आरोग्यावर आणि भविष्यावर काय विपरीत परिणाम होतात,” ही बाब पालकांना अत्यंत समजून सांगण्यात आली.
प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य बालविवाहाच्या खाईत लोटण्यापासून वाचले. बालविवाह करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा कायद्याने गुन्हा असून, यासाठी कडक शिक्षेची तरतूद असल्याची जाणीवही यावेळी पथकाने ग्रामस्थांना करून दिली. या कारवाईमुळे परिसरात बालविवाहाच्या कायद्याबाबत मोठी जनजागृती झाली असून, प्रशासनाच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.



