
शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आवाहन
गडचिरोली : जिल्ह्यातील ० ते १८ वर्षांतील जन्मजात हृदयविकार तसेच हृदयाशी संबंधित इतर आजारांनी ग्रस्त बालकांसाठी रविवार, ५ जुलै रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात स. ८.०० ते दु. ३.०० वाजेपर्यंत मोफत हृदय तपासणी व ‘2D Echo’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सेवा विभाग, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. दुर्गम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांना वेळेत निदान, तज्ज्ञ उपचार आणि अत्याधुनिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात ज्युपिटर हॉस्पिटल (ठाणे) येथील प्रख्यात बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंग उपस्थित राहून बाल रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. या सामाजिक उपक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या असून, दुर्गम भागातील गरजू बालकांसाठीच्या या दर्जेदार आरोग्य सेवेचे स्वागत केले आहे.
जन्मजात हृदयात छिद्र असणे. आईचे दूध पिताना किंवा खेळताना श्वास घेण्यास त्रास होणे. वारंवार दम लागणे. वयानुसार वजन अपेक्षेप्रमाणे न वाढणे. हात-पायांची नखे किंवा ओठ निळे पडणे. हृदयाशी संबंधित इतर कोणतीही लक्षणे जाणवणे. यापैकी कोणतीही लक्षणे मुलांमध्ये आढळल्यास पालकांनी मुलांना शिबिरात घेऊन येण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि सामाजिक संस्थांनी या शिबिराची माहिती जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून जास्तीत जास्त गरजू बालकांना याचा लाभ मिळू शकेल, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विदर्भ प्रमुख प्रवीण शर्मा, मंगेश चिवट, जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर, संपर्क प्रमुख सत्यपाल कत्तरवारे, महिला आघाडी संपर्क प्रमुख डॉ. संगिता राऊत (अमरावती), निखिल धोडरे आणि प्रफुल कोसे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.



