
७ दिवसांत बसस्थानक सुरू करा, अन्यथा शिवसेना (उबाठा) स्वतः करेल लोकार्पण – जिल्हाप्रमुख पवन गेडाम
चामोर्शी : चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) नवीन बसस्थानक सर्व सुविधांसह पूर्ण होऊन तब्बल दोन महिने उलटले आहेत. मात्र, कोणताही तांत्रिक अडथळा नसताना केवळ स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले आहे. या गंभीर मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला असून, “येत्या ७ दिवसांत बसस्थानक सुरू न झाल्यास शिवसेना स्वतः जनतेला सोबत घेऊन याचे लोकार्पण करेल,” असा थेट आणि आक्रमक इशारा गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन राघो गेडाम यांनी दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनावर हल्लाबोल करताना जिल्हाप्रमुखांनी स्थानिक नागरिकांच्या हालअपेष्टांवर बोट ठेवले. नवीन बसस्थानक बंद असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आधी कडक उन्हात आणि आता सुरू असलेल्या मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला तासनतास एसटीची वाट पाहावी लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्याच पैशातून उभारलेली ही भव्य वास्तू लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे कुलूपबंद राहणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक नागरिक व प्रवाशांनी या त्रासाबाबत शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पवन राघो गेडाम यांच्याकडे तक्रार केली होती. याची दखल घेत गेडाम यांनी स्वतः चामोर्शी येथे जाऊन बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. इमारतीचे बांधकाम आणि आवश्यक सोयी-सुविधा पूर्ण झाल्या असून केवळ उद्घाटनाचे राजकारण करण्यासाठी हे स्थानक रोखून धरल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.
प्रशासकीय ढिम्मपणावर तीव्र संताप व्यक्त करत पवन गेडाम म्हणाले, “जनतेच्या मूलभूत सुविधांवर राजकारण करणे आता बंद करा. जर स्थानिक आमदारांना या लोकहिताच्या कामाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नसेल, तर शिवसेना सात दिवसांनंतर स्वतः पुढाकार घेऊन याचे लोकार्पण करेल. त्यानंतर एकही एसटी बस जुन्या ठिकाणी रस्त्यावर उभी राहू दिली जाणार नाही. जनतेचा हक्क मिळवून देण्यासाठी गरज पडल्यास चामोर्शीत तीव्र चक्काजाम आंदोलन छेडले जाईल.”
“विकासकामांचे फक्त भूमिपूजन करणे आणि उद्घाटनाची खोटी श्रेयबाजी घेण्याचे राजकारण थांबवून हे बसस्थानक तातडीने प्रवाशांच्या सेवेत रुजू करावे, अन्यथा शिवसेनेच्या जनआंदोलनाच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल,” असा सज्जड दमही शेवटी जिल्हाप्रमुख पवन राघो गेडाम यांनी दिला आहे. या संभाव्य आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर राहील, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.



