गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी; इंग्लंडमधील ‘काउंटी क्रिकेट’साठी भारतीय संघात निवड

गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या ‘मॉडेल कॉलेज’चा बी.बी.ए. (जंगल व्यवस्थापन) शाखेचा विद्यार्थी रोहित राठोड याची इंग्लंड येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘काउंटी क्लब क्रिकेट’ स्पर्धेसाठी भारतीय प्रतिनिधी संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे केवळ महाविद्यालयातच नव्हे, तर संपूर्ण गोंडवाना विद्यापीठ परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

रोहित राठोडने आपल्या अफाट मेहनत, जिद्द आणि क्रिकेटमधील खेळाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे, ही रोहितसाठी आणि महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.

रोहितच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेक जोशी यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी रोहितचे कौतुक करत त्याला आगामी स्पर्धेसाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. जोशी यांनी रोहितच्या यशावर आनंद व्यक्त करताना, “रोहितचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल,” अशा शब्दांत त्याचे अभिनंदन केले.

रोहितच्या या निवडीबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत रोहितने उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालय, विद्यापीठ आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात गडचिरोलीच्या या सुपुत्राकडून आता मोठ्या कामगिरीची अपेक्षा केली जात असून, रोहितच्या निवडीने स्थानिक क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह संचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button