
मांजराचे अवशेष, बंदूक, चितळाचे मांस व मोराचे पाय जप्त ; वन्यजीव तस्करीचा संशय
लाखांदूर: तालुक्यातील दहेगाव येथे एकाने दुर्मिळ आणि संरक्षित वन्यजीव ‘खवले मांजर’ (Pangolin) याची अवैध शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनविभागाने धाड टाकून आरोपीच्या घरातून खवले मांजराचे अवशेष, शिजवलेले मांस, भरमार बंदूक आणि मोराचे पाय जप्त केले आहेत. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वनविभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, दहेगाव येथील नाजूक रूपचंद डोंगरवार याने वन्यप्राण्यांची अवैध शिकार केली आहे. या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भ. चन्ने यांच्या पथकाने १ जुलै रोजी आरोपीच्या घरावर अचानक छापा टाकला. घरझडतीदरम्यान पथकाला सुमारे १ किलो चितळाचे शिजवलेले मांस. खवले मांजराच्या शरीरावरील सुमारे १५० खवले. एक भरमार बंदूक. मोराचे दोन पाय व इतर वन्यजीवांचे अवशेष सापडले. हे सर्व साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले.
या प्रकरणी वनविभागाने आरोपी नाजूक डोंगरवार विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. २ जुलै रोजी त्याला अटक करून लाखांदूर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीला एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह, सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भ. चन्ने आणि त्यांच्या पथकाने केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
खवले मांजर हा अत्यंत दुर्मिळ आणि कायद्याने पूर्णपणे संरक्षित प्राणी आहे. त्याची शिकार किंवा तस्करी करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. या घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात वन्यजीवांची शिकार, तस्करी किंवा कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास त्वरित वनविभागाशी किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधावा. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे शिकारींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



