गडचिरोलीविदर्भ

एटापल्लीत धावत्या बसचा मागील भाग निखळला ; सुदैवाने दुर्घटना टळली

३० प्रवासी बालंबाल बचावले, सहाय्यक कारागीर निलंबित

गडचिरोली : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अक्षम्य हलगर्जीपणाचा आणि ढिसाळ कारभाराचा एक अजब आणि तितकाच धक्कादायक नमुना एटापल्ली येथे समोर आला आहे. येथील गोटूलसमोरील मुख्य रस्त्यावर एका धावत्या बसचा मागील संपूर्ण भाग (पत्रा) अचानक निखळून रस्त्यावर पडला. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने आणि मागे कोणतेही वाहन नसल्याने एक मोठा अनर्थ टळला असून बसमधील ३० प्रवासी बालंबाल बचावले आहेत. या गंभीर घटनेची दखल घेत विभागीय नियंत्रकांनी चौकशीचे आदेश दिले असून, अहेरी आगारातील एका सहाय्यक कारागिराला तात्काळ निलंबित केले आहे.

सोमवारी (ता. ६) संध्याकाळच्या सुमारास मानव विकास मिशनची, अहेरी आगाराची एक बस गडचिरोली येथून मुलचेरा आणि बोलेपल्ली मार्गे एटापल्ली शहरात पोहोचली. ही बस अत्यंत संथ गतीने शहरातील बसस्थानकाकडे जात असताना, गोटूलसमोरील मुख्य रस्त्यावर अचानक एक मोठा आवाज झाला. बसचा मागील पूर्ण भाग निखळून खाली पडल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तत्परता दाखवत बस थांबवली.

विचित्र आवाजामुळे बसमधील सुमारे ३० प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि ते तातडीने खाली उतरले. मागे वळून पाहिले असता बसचा मागचा पत्रा निखळल्याचे पाहून प्रवाशांना धक्काच बसला. हा प्रकार पाहताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. प्रवाशांनी आणि नागरिकांनी बस चालक व वाहकाला घेरून प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या बसचा मागील पत्रा अत्यंत जीर्ण झाला होता आणि तो केवळ तात्पुरता कसाबसा चिकटवण्यात आला होता. ही बस जर शहराबाहेर राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगात असती किंवा तिच्या मागे एखादा दुचाकीस्वार असता, तर मोठा जीवघेणा अपघात घडला असता. मात्र, शहरात वेग कमी असल्याने दुर्घटना टळली.

गडचिरोलीचे विभागीय नियंत्रक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. बसच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत अहेरी बस आगारातील सहाय्यक कारागिराला थेट निलंबित करण्यात आले आहे.  मात्र, या कारवाईनंतरही प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गडचिरोली जिल्ह्यातील जीर्ण आणि ‘खटारा’ बसची दुरुस्ती कधी होणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button