गोंदियाविदर्भ

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी! ; दूध संकलन व शीतकरण केंद्रामुळे २ हजार कुटुंबांना सुगीचे दिवस

गोंदिया : ग्रामीण भागातील दुग्धव्यवसायाला व्यावसायिक स्वरूप देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने गोरेगाव तालुक्यातील चिलाटी येथे सुरू झालेले ‘एकता दूध शीतकरण केंद्र’ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. ‘उमेद’ (MSRLM) अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या केंद्रामुळे सुमारे ४२ किलोमीटर परिसरातील २ हजार कुटुंबांना थेट रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.

निसर्ग CLF, सोनी (ता. गोरेगाव) येथे उभारण्यात आलेल्या या केंद्रासाठी ७१.२८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या केंद्राची दररोज ५ हजार लिटर दूध शीतकरण करण्याची क्षमता आहे. सध्या परिसरातील ८ दूध संकलन केंद्रांमार्फत सुमारे ६०० ते ७०० लिटर दुधाचे संकलन केले जात आहे. अद्ययावत शीतकरण यंत्रणेमुळे दुधाची गुणवत्ता टिकून राहत असल्याने, पशुपालकांना प्रति लिटर २ ते ३ रुपये अधिक दर मिळत आहे.

हे केंद्र केवळ दुधाचे संकलन करत नाही, तर ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयं-सहायता गटांनाही सक्षम करत आहे. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या जास्तीच्या उत्पन्नामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रकल्पाच्या यशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळाली असून, हा उपक्रम जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरत आहे.

योग्य तापमानात दुधाची साठवणूक केल्याने खराब होण्याचे प्रमाण घटले आहे. दर्जेदार दूध उत्पादनामुळे बाजारपेठेतही चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. या केंद्राच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय आता एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग बनला असून, परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button