गोंदियाविदर्भ

राज्य नोडल अधिकाऱ्यांकडून विविध आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा

जिल्हास्तरीय आरोग्यविषयक आढावा सभा ; उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांची उपस्थिती

गोंदिया : जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने के.टी.एस. सामान्य रुग्णालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय आरोग्यविषयक आढावा सभा संपन्न झाली. मुंबई येथील उपसंचालक तथा राज्याचे नोडल अधिकारी डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली आणि नागपूर विभागीय उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा विस्तृत आढावा घेण्यात आला.

या आढावा सभेत माता-बाल संगोपन, क्षयरोग (TB), कुष्ठरोग, सिकलसेल, हिवताप आणि कर्करोग तपासणी यांसह विविध राष्ट्रीय आरोग्य अभियानांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. तळागाळातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने राज्य नोडल अधिकारी डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. विशेषतः जिल्ह्यातील १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींचे गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करणे, ग्रामीण रुग्णालयांमधील बेड ऑक्युपन्सी रेट वाढवणे आणि आरोग्य विभागाच्या सर्व उद्दिष्टांची शंभर टक्के पूर्तता करण्याचे आदेश त्यांनी दिले.

बैठकीत जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, कायाकल्प, ई-संजीवनी टेलीकन्सल्टेशन, तसेच ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यात आला. गर्भवती मातांना प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात उत्तम आरोग्य सेवा देण्यासह, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद कुमार वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कार्यक्रम समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा सभेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला नवसंजीवनी मिळून सेवा अधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button